हिमायतनगर,अनिल मादसवार| सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यत म्हणजेच शंकरपाटावरील बंदी उठविल्यानंतर पहिल्यांदाच सर्वदूर ख्यातीप्राप्त असलेल्या हिमायतनगर (वाढोणा – वारणावती) येथील श्री परमेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी काळात होणाऱ्या यात्रा उत्सव संदर्भात यात्रा कमिटीची नियोजन बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यात बक्षीस वाढीला मान्यता देण्यात आली असून, मागील अकरा वर्षांपासून बंद असलेल्या शंकरपट बैलगाडा शर्यतीचे नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी श्री परमेश्वर मंदिर शंकरपट समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पळसपूर रोडवरील जागेची पाहणी केली असून, हि शंकरपट स्पर्धा दोन गटात घेतली जाणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या हिमायतनगरातील पट शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटणार आहेत.
सबंध विदर्भ – मराठवाडा- तेलंगणा – आंध्रप्रदेश – कर्नाटक राज्यात प्रसिद्ध असलेली हिमायतनगर (वाढोण्याच्या) श्री परमेश्वराची महाशिवरात्री यात्रा उत्सव जवळ येऊन ठेपला आहे. यानिमित्त मंदिर समितीची यात्रेचा कार्यक्रम व नियोजनाबाबतची बैठक ३० जानेवारी रोजी श्री परमेश्वर मंदिराच्या सभागृहात ज्येष्ठ शेतकरी विठ्ठलराव चौहान यांच्या अध्यक्षतेखाली व मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. देवाधिदेव भगवान महादेवाचा सर्वात मोठा उत्सव महाशिवरात्री यात्रा हिमायतनगर वाढोणा शहरात 07 मार्चपासून सुरू होणार असून 23 मार्च रोजी समाप्त होणार आहे. यात्रा उत्सवा दरम्यान भाविक – भक्त, व्यापारी, कलावंत, खेळाडू, भजनी मंडळ व यात्रेकरूना येणाऱ्या आडी- अडचणी व नियोजन यावर सखोल चर्चा झाली. तसेच यात्रेच्या सात दिवस ज्ञानेश्वरी व वीणा पारायण सप्ताह, काकडा आरती, हरिपाठ, अखंड हरिनाम, किर्तन, प्रवचने आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. त्यानंतरच्या काळात धार्मिक – सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा पशु प्रदर्शन व शेतकऱ्यांसाठी खास करून शंकर पाटाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रा काळात आयोजित कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आणि यश मिळविणाऱ्या संघ, खेळाडू, शालेय स्पर्धा, कब्बड्डी, कुस्त्यांची दंगल, भजन, पशुप्रदर्शन, शंकरपट, मनोरंजन आदींसह महिलांसाठी विविध स्पर्धा घेऊन विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विविध स्पर्धांमध्ये देण्यात येणाऱ्या बक्षीसामध्ये वाढ करण्यात आली असून, यात्रा सब कमिटी तसेच आयोजित विविध कार्यक्रमाच्या उपसमित्या नेमण्यात आल्या आहेत. एकूणच यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या सुविधा व दर्शनार्थीना प्रसादाचे वितरण यासाठी विशेष व्यवस्था करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. दरम्यान आज शंकरपट समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्यांची बैठक होऊन शंकरपाटाच्या जागेची पाहणी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्या उपस्थितीत करण्यात आली. आगामी काळात होणारी शंकर पट स्पर्धा हिमायतनगर शहरातून पळसपुरकडे जाणाऱ्या रोडवरील पेट्रोल पंपाच्या पुढील मैदानात होणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी प्रभारी मुख्याधिकारी ताडेवाड, सेक्रेटरी अनंता देवकते, संचालक लताबाई पाध्ये, मथुराबाई भोयर, लताबाई मुलंगे, राजराम झरेवाड, माधव पाळजकर, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, भोयर गुरुजी, सुभाष शिंदे, गणेश शिंदे, अन्वर खान, संतोष गाजेवार, ज्ञानेश्वर शिंदे, पापा शिंदे, मारोती हेंद्रे, गोविंद शिंदे, श्याम जक्कलवाड, विठ्ठल ठाकरे, रामभाऊ सूर्यवंशी, बाबूअप्पा बंडेवार, राम नरवाडे, गोविंद शिंदे, मंगेश धुमाळे, विकास नरवाडे, गंगाधर बासेवाड, साहेबराव अष्टकर, संदीप तुपतेवार, सदाशिव सातव, कांता गुरू वाळके, राजू गाजेवार, संतोष वानखेडे, बालाजी ढोणे, लक्ष्मण डांगे, अशोक अगुलवार, मनोज पाटील, नागेश शिंदे, परमेश्वर काळे, प्रशांत राहुलवाड, सतीश सोमसेटवार, शंकर चलमेलवार, सुभाषराव कल्लूरकर, गजानन हरडपकर, विपूल दंडेवाड, जितू सेवनकर, पापा पार्डीकर, राम शक्करगे, रामेश्वर पेटपल्लेवार, पंडित ढोणे, प्रल्हाद मुधोळकर, ज्ञानेश्वर बास्टेवाड, देवराव वाडेकर, आदींसह मोठ्या संख्येने गावकरी नागरिक व शेतकरी उपस्थित होते.