नांदेड| येत्या रविवार दि. १० मार्च २०२४ रोजी नांदेड येथे तिसऱ्यांदा आयोजित एक दिवशीय सातवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा एकमुखी निर्धार येथे आयोजित समाज बांधवांच्या व्यापक बैठकीतून व्यक्त करण्यात आला.
राधाई अर्बन मल्टीपल निधी, तरोडा नाका, गुरु रविदास चौक, नांदेड येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम टोम्पे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत नांदेड येथे तिसऱ्यांदा आयोजित करण्यात येत असलेल्या सातव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनास यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु असा एकमुखी निर्धार समाज बांधवांनी व्यक्त केला. हे संमेलन पुन्हा नांदेडमध्ये होणार असल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला.
अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनाचे मुख्य प्रवर्तक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी या बैठकीचे प्रास्ताविक केले. आतापर्यंतच्या विविध ठिकाणी संपन्न झालेल्या सहा साहित्य संमेलनाचा आढावा तसेच सातव्या साहित्य संमेलनाची सविस्तर रुपरेषा त्यांनी यावेळी सादर केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव दुधंबे, नरसिंग सुर्यवंशी, नारायण वाघमारे, नामदेव फुलपगार, व्यंकटराव उतकर, गंगाधर लष्करे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
बैठकीस उपस्थित अरविंद येलतवार, संतोष सुर्यवंशी, विठ्ठल उकंडे, शिवाजी सोनटक्के, सुरेश वाघमारे, गोविंद सोनटक्के, गोविंद वाघमारे, नागेश सोनटक्के, बालाजी टोम्पे, हिरामण वाघमारे, तुकाराम जोगदंड यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना निमंत्रित न करता हे संमेलन अराजकीय असावे असे मत बहुतेकांनी यावेळी मांडले. भीमराव वाघमारे यांच्या आभार प्रदर्शनाने बैठकीची सांगता झाली.
साहित्य संमेलन व गुरु रविदास जयंतीनिमित्त निबंध आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची निवड लवकरच आयोजित करावयाच्या पुढील व्यापक बैठकीत करण्यात येणार आहे तसेच संयोजन समितीच्या वतीने प्रचार प्रसारासाठी व निधी संकलनासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दौरा करण्यात येणार आहे.