नांदेड| मराठी भाषेच्या संवर्धनात मराठी नाटकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत शिक्षणशास्त्र संकुलाचे प्रा.डॅा. महेश जोशी यांनी व्यत्क केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा, वाड्मय व संस्कृती अभ्यास संकुल, ज्ञानस्त्रोत केंद्र आणि ललित व प्रयोगजीवी कला संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२४’ निमीत्त नाट्य अभिवाचन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. याप्रसंगी पुढे बोलताना जोशी म्हणाले की, नाटक ही भाषेच्या अंगाने महत्त्वाची कला आहे. मराठी नाटकांनी वर्षानुवर्षे मराठी संस्कृती जपलेली आहे.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमीत्त विद्यापीठाने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. नुकतेच विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते या पंधरवाड्याचे उद्धाघाटन करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून दि. १९ जानेवारी रोजी सुमन केशरी लिखीत व डॉ. स्वाती दामोदरे अनुवादीत ‘गांधारी’ या मराठी नाटकाचे अभिवाचन ललित व प्रयोगजीवी कला संकुलात करण्यात आले होते. या नाट्यअभिवाचनाला विद्यार्थ्यानी भरभरुन प्रतिसाद दिला. नाटकाच्या अभिवाचनानंतर नाटकाचा आशय-विषय व प्रयोगांच्या शक्यतांवर या प्रसंगी साधक-बाधक चर्चा करण्यात आली.
अभिवाचनाचा हा कार्यक्रम ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या पुढाकारतुन घेण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. राहुल गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. कैलास पुपुलवाड यांनी केले. नाट्य अभिवाचनामध्ये प्रा. अभिजीत वाघमारे, प्रा. श्वेता करोसीया, अश्विनी भालेकर, गौरी चौधरी, विजय गजभारे, अनिल दुधाटे, प्रतिक इंगोले, वैष्णवी इंगळे, सचिन थोटे, मिनाक्षी आडे, प्रांजली मोतीपवळे, वैभव देशमुख, सुदर्शन चिंतोरे आदीनी सहभाग घेतला होता.