देश-विदेश

राजधानी दिल्लीत महाराष्ट्रचा झेंडा; देशात सर्वात स्वच्छ राज्य लहान शहरात सासवडला प्रथम तर महानगरात नवी मुंबईला तृतीय पुरस्कार

नवी दिल्ली| देशातील सर्वाधिक स्वच्छ राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याने स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांमध्ये आज आपला ठसा उमटवत, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रथम पुरस्कार स्वीकारला. यासोबतच, स्वच्छता सर्वेक्षणाच्या विविध श्रेणीत एकूण 12 पुरस्कारांसह आपला झेंडा फडकावला. स्वच्छ शहरांच्या श्रेणीत नवी मुंबई महानगरपालिका देशात तृतीय स्थानावर, पुणे महानगरपालिका दहाव्या स्थानावर तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने 13 वा स्थान मिळवला. नगर परिषदांमध्ये सासवड (पुणे) यांनी देशात बाजी मारत, प्रथम पुरस्कार प्राप्त केला तर लोणावळा (पुणे) नगरपरिषदेने तृतीय पुरस्कार मिळवला.

राजधानी दिल्लीतील भारत मंडपम, प्रगती मैदान येथे ‘स्वच्छ सर्व्हेक्षण-2023’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध श्रेणीतील पुरस्कारांचे यावेळी वितरण करण्यात आले. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री हरदीपसिंह पुरी, सचिव मनोज जोशी यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राला सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य म्हणून गौरविण्यात आले आहे. या श्रेणीत मध्यप्रदेश आणि छत्तीसगडने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे.

महाराष्ट्र राज्याला स्वच्छता सर्वेक्षण-2023 साठीचा प्रथम पुरस्कार
केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण-2023 अंतर्गत महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला. “बेस्ट परफॉमिंग स्टेट” चा प्रथम पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते, राज्याचे शहरी विकास विभागाचे प्रधान सचिव, डॉ के.एच. गोविंदराज यांनी राज्याच्या वतीने स्वीकारला. राज्यातील सर्व शहरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये सार्वजनिक शौचालयांचे आधुनिकीकरण, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया केंद्र स्थापन करणे, घनकचरा व्यवस्थापन या सारख्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणी, तसेच राज्याने संपूर्ण स्वच्छता जनजागृती मोहिमेवर भर देत, नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबतची जागरूकता वाढविली आहे. या उपाययोजनांमुळे राज्याच्या एका शहराला सेवन स्टार रेटिंग, दोन शहरांना फाइव स्टार रेटिंग, 28 शहरांना थ्री स्टार रेटिंग, 82 शहरांना वन स्टार रेटिंग, 21 वॉटर प्लस शहरे, 261 ओडीएफ++ शहरे, 87 ओडीएफ + शहरे, 24 ओडीएफ शहरांना दर्जा मिळाला असून, उपरोक्त सर्व मानांकनांच्या आधारे राज्याला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला.

सासवड नगरपालिका देशात अव्वल, लोणावळा देशात तृतीय क्रमांकावर
पुणे जिल्‌ह्यातील सासवड आणि लोणावळा नगरपरिषदेच्या एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्येच्या वर्गवारीमध्ये पहिल्या तीन क्रमांकांच्या पुरस्कारांमध्ये समावेश होता. सासवड नगरपालिकेला केंद्रसरकारचा सर्वोत्तम स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे. छत्तीसगड मधील पाटण आणि लोणावळा हे या श्रेणीतील दुस-या आणि तिस-या क्रमांकाची स्वच्छ शहरे ठरली. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, डॉ राजेश देशमुख यांनी राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.

सासवड नगरपालिका अंतर्गत घनकचऱ्यावर १०० टक्के प्रक्रिया, ४० ते ५० टक्के सांडपाण्याचा पुर्नवापर, शहर सौंदर्यीकरणांतर्गत शहरात १८ ठिकाणी विविध शिल्पांची उभारणी, प्लॅस्टीकचा रस्त्यांच्या कामासाठी पुर्नवापर, बांधकाम व इतर साहित्यांची योग्य विल्हेवाटीची व्यवस्था केली असून टाकाऊ वस्तू पासून विविध शिल्प वापरून ‘वेस्ट टू वंडर पार्क’ उभारले आहे. शहराला थ्री स्टार व वॉटर प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. लोणावळा नगरपरिषदेनेही या स्पर्धेकरिता विविध उपक्रम राबवले. त्यात घनकचऱ्यावर १०० टक्के प्रक्रिया, सांडपाण्याचा पुर्नवापर, शहरात रिड्युस, रियूज, रिसायकल (आरआरआर), केंद्राची स्थापना करून 2 टन इतक्या वस्तू 1 हजार 100 पेक्षा जास्त लोकांकडून जमा केल्या व त्यातील 1.5 टन वस्तू गरजू लोकांना देण्यात आल्या.

देशात स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबई तृतीय स्थानावर, पुणे दहाव्या तर पिंपरी –चिंचवड तेराव्या स्थानावर
एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत नवी मुंबई महानगरपालिकेला तृतीय पुरस्कार मिळाला. महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या श्रेणीत इंदूर आणि सूरत शहरांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. नवी मुंबई तांत्रिकदृष्ट्या तीसरा क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे कचरा मुक्त शहरांच्या यादीत सेवन स्टार हे अतिशय प्रतिष्ठेचे मानले जाणारे मानांकन यंदा नवी मुंबईला मिळाले आहे. असे मानांकन मिळवणारे सूरत नंतर नवी मुंबई हे दुसरे शहर ठरले आहे. सांडपाणी प्रक्रिया संयंत्र, वॉटर प्लस मानांकन, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण यांचा समावेश आहे.

पुणे महानगरपालिका दहाव्या स्थानावर
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आयोजित केले जाणाऱ्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ मध्ये स्वच्छतेच्या बाबतीचे निकष तपासण्यात आले. त्यानुसार घरोघर कचरा जमा करणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे यासह २४ प्रकारच्या विविध घटकांचा समावेश होता. पुणे शहराने सगळ्या निकषांमध्ये चांगली कामगिरी केल्याने, त्यास दहावा क्रमांक व फाईव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे.

पिंपरी-चिंचवडला कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार रेटिंग
एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत, विविध उपक्रम राबविल्यामुळे केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण -2023 साठी पिंपरी-चिंचवड शहराला कचरामुक्त शहर श्रेणीमध्ये 13 वा पुरस्कार मिळाला आहे. स्वच्छ सर्वेक्षणात प्रथमच कचरा मुक्त शहर म्हणून फाइव स्टार मानांकनासह वॉटर प्लस रेटिंग मिळाला आहे.

महाराष्ट्रातील आठ नगरपालिका यशस्वी
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ या राष्ट्रीय स्पर्धेत पश्चिम विभागात सलग सहाव्यांदा यश मिळविले आहे. 25 ते 50 हजार लोकसंख्या असलेल्या वर्गवारीमध्ये या नगरपालिकेला पुरस्कार प्राप्त झाला व यावेळी केंद्रीय सचिव मनोज जोशी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सातारा जिल्ह्यातील कराड आणि पाचगणी नगरपालिकेने 50 हजार ते 1 लाख लोकसंख्येच्या आतील नगरपालिकेने पुरस्कार पटकावला आहे. एक लाखाहून कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये सासवड, लोणावळ्यासह, कराड, पाचगणी व विटा यांनी स्वच्छ शहरांचे पुरस्कार पटकावले आहेत. तर गडहिंग्लज, विटा, देवळाली आणि सिल्लोड या शहरांनी मानांकनात स्थान मिळवले आहे. यामुळे देशातील पहिल्या दहा उत्कृष्ट स्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील ८ शहरांनी स्थान मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!