रातोळी येथील महादेव मंदिरात मूर्तीप्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात
नायगाव/नांदेड। आ. राम पाटील रातोळीकर यांच्या पुढाकारातून रातोळी (ता.नायगाव) येथे उभारण्यात आलेल्या भव्य महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा आणि मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना अत्यंत मंगलमय वातावरणात, साधुसंतांच्या उपस्थितीत हरहर महादेवाच्या गगनभेदी गजरात आणि शंखनिनादात पार पडला.
रातोळी हे गाव नांदेड-मुखेड या मुख्य रस्त्यावर मन्याड निदीच्या काठी वसलेले आहे. अत्यंत धार्मिक आणि दानशूरांचे गाव म्हणून रातोळीची ख्याती आहे.नदीकाठी गेल्या अनेक वर्षांपासून महादेवाची पिंड आहे. देवाधी देव महादेवाची पिंड भव्य मंदिरात प्रतिष्ठापीत व्हावी आणि भक्तांना देवदर्शाची सोय व्हावी यासाठी भूमिपूत्र आमदार राम पाटील रातोळीकर यांनी पुढाकार घेवून मंदिर उभारणीसाठी सुमारे पंधरा लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
शिवाय मुख्य रस्त्यालगत असलेल्या त्यांच्या जमीनीतून मंदिरापर्यंत रस्ता सुद्धा करून दिला.मुख्य रस्त्यालगत मंदिराची भव्य कमान उभारण्यात आली. बुधवार दि. 3 जानेवारी रोजी साधुसंतांच्या उपस्थितीत मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. धार्मिक विधी, भजनी मंडळ, संतांची मिरवणूक आणि हरहर महादेवाचा गजर यामुळे संपूर्ण गाव भक्तीमय वातावरणात तल्लीन झाले होते. मंदिरासोबतच मंदिर परिसराचेही सुशोभीकरण होत असून आ. राम पाटील रातोळीकर यांच्या या उपक्रमाचे पंचक्रोशीत स्वागत होत आहे.
या सोहळ्यास माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर,आ. तुषार राठोड, माजी आ. वसंतराव चव्हाण, मा.आ.हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर, प्रणिताताई चिखलीकर, संजय अप्पा बेळगे, मारोतराव कवळे गुरुजी, श्रावण पाटील भिलवंडे, रविंद्र चव्हाण, विजय चव्हाण, अशोक पाटील मुगावकर, बालाजी बच्चेवार,खुशाल पाटील उमरदरीकर, संतोष वर्मा, हाणमंत पाटील चव्हाण, व्यंकटराव पवार, आलूवडगावकर, दत्ता पाटील हाळदेकर, राजू गंदिगुडे, बालाजी पाटील ढगे, अशोक गजलवाड, प.पू.त्यागी महाराज हनुमान गड नांदेड, श्री 108 शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूर,प.पू. नराशाम महाराज येवतीकर, श्री 108विरुपाक्ष शिाचार्य महाराज मुखेड, श्री 108 सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज, बेटमोगरा,प.पू. यदुबन गुरु गंभीरबन हाराज कोलंबी यांच्यासह गावातील शिवराज पाटील, विलास माळगे, विश्वंभर पाटील, व्यंकटराव टाकळे,एम.आर.गुरुजी, शंकरराव गोपछडे,नंदकुमार पाटील, साहेबराव पाटील,दत्तराम पाटील,शिवराज मालीपाटील,डॉ.चिद्रे आदी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करून आ. राम पाटील रातोळीकर यांच्यावतीने गावातील बायलेकींना प्रभूश्रीरामाची आकर्षक मुर्ती भेट देवून येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त घरोघरी रोषणाई व दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले. यानिमित्त आयोजित महाप्रसादाचा पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी लाभ घेतला. महादेव मंदिराची नूतन वास्तू पाहण्यासाठी व मंदिरातील मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.