रामराज्यासाठी समान नागरी कायदा आवश्यक : अॅड. आश्विनीकुमार उपाध्याय भाग्यलक्ष्मीच्या व्याख्यानमालेस उत्साहात सुरुवात
नांदेड| देशातील वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, दहशतवाद, सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न, पंथवाद, दांभिकता, कट्टरता यावर योग्य उपाययोजना करायच्या असतील आणि भारताची संस्कृती, परंपरा, रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरावयाची असेल तर समान नागरी कायद्याची आवश्यकता आहे, असे आग्रही मत दिल्ली येथील सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. आश्विनीकुमार उपाध्याय यांनी गुरुवारी व्यक्त केले. श्रोत्यांनी खचाखच भरलेल्या कुसुम सभागृहात भाग्यलक्ष्मी बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या २१व्या व्याख्यानमालेतील ‘समान नागरी कायदा’ या विषयावर त्यांनी यावर्षीचे पहिले विचारपुष्प गुंफले.
व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी बँकेच्या अध्यक्षा सीमा किशोर अतनूरकर तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करून दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. बँकेच्या अध्यक्षा सीमा अतनूरकर यांनी प्रास्ताविकात बँकेच्या एकूण कार्यप्रणालीवर त्यांनी धावता प्रकाश टाकला. सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देत बँकेने राज्यात २२ शाखांचा विस्तार केला आहे. अत्याधुनिक संसाधनांचा वापर करीत पारदर्शक कारभार करणाऱ्या भाग्यलक्ष्मी बँकेला अनेक राष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्राप्त झाले आहेत. सहकार क्षेत्राला भक्कम करणाऱ्या भाग्यलक्ष्मी बँकेने समाजाच्या बौद्धिक सक्षमीकरणासाठी गेल्या २१ वर्षांपासून वि व्याख्यानमाला चालवित असल्याचेही त्या म्हणाल्या. आश्विनीकुमार उपाध्याय पुढे म्हणाले की, आपल्या देशाच्या राज्यघटनेने कधीही धार्मिक शिक्षणावर बंधन लादले नाही. देशाच्या राज्यघटनेच्या मूळ प्रतींवर प्रत्येक भागाच्या अगदी सुरूवातीला एक चित्र होते.
त्यात प्रभू रामचंद्रापासून ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत अनेक महात्म्यांची चित्रे होती. या चित्रांमागील पार्श्वभूमी ही त्यांच्या विचारांनुसार संवैधानिक मूल्ये जपली जावीत हा होता; परंतु १९७७ मध्ये पंडित नेहरूंनी पंडितांना बदल करण्याचे पहिले पाप केले आणि धर्मनिरपेक्षता हा शब्द घुसवत भारताच्या संविधानावर पहिले आक्रमण केले. त्यानंतर संविधानाच्या अनुषंगाने कामकाज चालविण्यात आले नाही हे दुर्दैव! आपल्या पूर्वजांनी जे शौर्य गाजविले, जे पराक्रम केले ते शौर्य गाजवितांना, ते पराक्रम करतांना त्यांच्या हातून जे जे कार्य अधुरे राहिले आहे, ते अधुरे कार्य आता पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. या देशात पंधराव्या शतकापर्यंत केवळ आणि केवळ हिंदू होते; परंतु त्यानंतरची परिस्थिती आता वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही. देशात सध्याच्या परिस्थितीत जी अशांतता निर्माण झाली आहे, त्या अशांततेची कारणमीमांसा होणे आवश्यक आहे. मुळातच आपल्या देशातील शिक्षणप्रणाली ही शिक्षणमाफियांच्या आणि कोचिंगमाफियांच्या हाती गेल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे देशात वन नेशन वन एज्युकेशनची नितांत गरज निर्माण झाली आहे. केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय यांचा अभ्यासक्रम देशपातळीवर समान आहे.
तद्वतच देशात समान शिक्षण पद्धती लागू करण्याची गरज आहे.प्रादेशिक भाषांचा विकास व्हावा, प्रादेशिक क्षेत्राची माहिती व्हावी यासाठी काही प्रमाणात प्रादेशिक विषयांनाही प्राधान्य देण्यात यावे, असे सांगून देशाच्या भवितव्यासाठी समान शिक्षण आणि समान नागरी कायदा अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले. गुरूकुल प्रणालीत समानतेचे तत्त्व होते. त्यामुळे अशा शिक्षणप्रणालीची कास धरणे आवश्यक झाले आहे, असे सांगून ते म्हणाले की, या देशात सर्व नागरिकांना समानतेच्या पातळीवर आणून खऱ्या अर्थाने लोकशाही समृद्ध करायची असेल तर समान नागरी कायदा हा एकमेव उपाय आहे, असेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज, गुरू गोविंदसिंघजी यांच्यामुळे देशात हिंदू धर्म जिवंत राहिला; अन्यथा भारताची अवस्था वेगळी असती, असे सांगतांनाच आता जागृत राहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
अध्यक्षांचा गौरव – भाग्यलक्ष्मी बँकेच्या व्याख्यानमालेच्या बौद्धिक मेजवानीच्या उपक्रमाचे कौतुक करतांनाच बँकेच्या वाटचालीबद्दल अॅड. आश्विनीकुमार उपाध्याय यांनी गौरवोद्गार काढले व अध्यक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदीचे गाढे अभ्यासक डॉ. राजेंद्र मुंदडा यांनी आपल्या अत्यंत सुमधुर शैलीत केले. त्यांनीही अध्यक्षा सीमा अतनूरकरांनी बँकेच्या प्रगतीसाठी सर्व सीमा ओलांडल्याचे गौरवपूर्ण नमूद केले.
सहकार क्षेत्रातील खरीखुरी ‘भाग्यलक्ष्मी’: विश्वास देशमुख व्याख्यानमालेचे प्रमुख पाहुणे जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख आपल्या मनोगतात म्हणाले की, सहकार क्षेत्रात भाग्यलक्ष्मी बँकेने दिलेले योगदान हे अत्यंत उच्च स्थानाचे आहे. आधुनिक संसाधनांचा वापर करीत ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देतांना लोकशाही तत्त्वाचा अंगीकार करीत सामान्य आणि वंचितांनाही आर्थिक सक्षमतेच्या प्रवाहात आणण्याचे काम भाग्यलक्ष्मी बँकेने केले आहे. त्यामुळे बँकेच्या सहकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सहभागाचा गौरव करावा लागेल, असेही ते म्हणाले.
वन नेशन वन एज्युकेशनची गरज
देशातील सध्याची शिक्षणप्रणाली ही शिक्षणमाफियांच्या इशाऱ्यावर चालत आहे. त्यामुळे देशात ४२ प्रकारच्या बोर्डाद्वारे शिक्षण दिले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक समानता निर्माण होत नाही आणि हीच बाब राष्ट्राच्या प्रगतीला बाधा ठरत आहे. त्यामुळे देशाला खऱ्या अर्थाने समृद्ध करावयाचे असेल तर देशात वन नेशन वन एज्युकेशन आवश्यक असल्याचे मत अॅड. आश्विनीकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केले आहे.