अयोध्येतील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त सिडको येथील श्री राम मंदिरात उत्सव शोभायात्रा, महाआरती, श्री राम धून, दीपोत्सव आणि संगीतमय कार्यक्रम
नवीन नांदेड। तब्बल पाचशे वर्षांचा संघर्ष आणि 76 वेळेस लढा देऊन हिंदूंची अस्मिता असलेल्या श्रद्धास्थान श्री अयोध्या धाम येथे प्रभू रामचंद्रांची येत्या दि. 22 रोजी प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या निमित्ताने नांदेड शहरातील सिडको येथील राम नगरातील श्री राम मंदिर संस्थांनच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून महाआरतीचेही आयोजन करण्यात आले आहे.
अयोध्या येथील राम जन्मभूमी मंदिराचे लोकार्पण व श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना येत्या दि. 22 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. याच धर्तीवर नांदेड शहरातील सिडको परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सिडको पासून श्री राम मंदिर सिडकोपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
त्यानंतर अयोध्या येथील महाआरतीच्या वेळ साधून सिडको येथील राम मंदिरात दुपारी 12.30 मिनिटांनी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी 4.30 वा. लक्ष्मीकांत रवंदे यांच्या संकल्पनेतून ‘श्रीराम धून’ हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी श्रीराम भजन व भक्तीगीतांचा रामभक्तांना आनंद घेता येणार आहे. सायंकाळी 7.00 वा. श्रीराम मंदिराच्या प्रांगणात दीपोत्सव साजरा करण्यात येणार असून यावेळी लक्षदिव्यांचा लखलखट करण्यात येणार आहे.
दिनांक 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिर सिडको येथे आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रा, महाआरती, श्रीराम धून आणि दीपोत्सवात रामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्रीराम मंदिर रामनगर सिडको नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.