भोकर,नांदेड| निसर्गाच्या लहरी पणामुळे खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शासनाने मागील गारपीटीची अद्याप नुकसान भरपाई दिली नाही. या भागातील शेतकऱ्यांवर वारंवार नैसर्गिक संकट येत आहे. अशावेळी शासनाने केवळ घोषणाबाजी न करता नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. भोकर तालुक्यातील भोसी व चिदगिरी या गावातील नुकसान झालेल्या शेतीची माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांचे अश्रू पुसत त्यांना तत्काळ मदत करण्याची शासनाकडे मागणी केली.
नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करताना तो सरसकट केल्या जात नाही. जर 2 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असेल तर फक्त 1 हेक्टरचाच पंचनामा संबंधित यंत्रणा करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे यावेळी आपदग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या या व्यथा ऐकून घेतल्यानंतर अशाप्रकारे चुकीचे पंचनामे होऊ नयेत याची खबरदारी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी असेही त्यांनी सांगितले.विम्याचे पैसे शासनाने भरले आहेत. ज्या पिकांसाठी विमा उपलब्ध आहे. त्या नुकसान झालेल्या पिकांचा विमा तत्काळ द्यावा अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
या पाहणी दौऱ्या दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, मुदखेड तालुकाध्यक्ष बाळासाहेब देशमुख बारडकर, भोकरचे बाजार समिती सभापती जगदीश पाटील भोसीकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रकाश देशमुख भोसीकर, काँग्रेसचे भोकर तालुकाध्यक्ष भगवान दंडवे, माजी नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर, युवक काँग्रेसचे विधानसभाध्यक्ष मारोती पाटील किरकन, उपविभागीय महसूल अधिकारी सचिन यादव, तहसीलदार राजेश लांडगे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी भाऊसाहेब भराटे, गटविकास अधिकारी माधव केंद्रे, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, आदिनाथ चिंताकुठे,मिर्झा ताहेर बेग,हमीद खॉ पठाण,विकास क्षीरसागर,जवाद बरबडेखर, डॉ.फारुख इनामदार यांची उपस्थिती होती.
अशोकराव चव्हाण म्हणाले की, मागील अनेक दिवसांपासून निसर्गाच्या लहरी पणामुळे सर्वत्र अवकाळी पाऊस, गारपिटीने हातातोंडाशी आलेला खरीप व रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शासन केवळ गोड आश्वासनं देऊन शेतक-याची थट्टा करीत आहे.अतिवृष्टीने नूकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही.शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सत्ता टीकवण्यातच मश्गूल आहेत. मागील आठवड्यात पून्हा निसर्ग कोपल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने केवळ तीन हेक्टर क्षेत्रालावरील नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतल्याने अधिकारी कमी अधिक बाधीत क्षेत्र ग्राह्य धरत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून तात्काळ अहवाल वरिष्ठांना सादर करून आधार द्यावा अशा सुचना यावेळी अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.