सर्वोच्च न्यायालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण २६ नोव्हेंबर रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयात होणार आहे ही ऐतिहासिक घटना तमाम आंबेडकरी जनतेसाठी आणि आंबेडकरी अनुयायांसह सर्व भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची आहे. जगामध्ये सर्वत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत. गावोगावी सुद्धा मोठ्या दिमाखात ते उभे आहेत. जनतेचे बाबासाहेबांबद्दलचे प्रेम आणि अभिमान याची साक्ष हे पुतळे देत असतात. मानवतेच्या महासागरांना आणि विश्वाच्या कानाकोपऱ्याला बाबासाहेब सतत महासूर्यागत प्रेरणा देत उभे असतात. याचवर्षी १४ एप्रिल २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला, अधिवक्ता-ऑन-रेकॉर्ड प्रतीक बोंबार्डे यांनी भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना निवेदन दिले होते, ज्यामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याची मागणी केली होती. ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्याची मागणी केली होती. तसेच यावर्षीच्याच सप्टेंबरमध्ये सुप्रीम कोर्ट आर्ग्युइंग कौन्सेल असोसिएशननेही पुतळा बसवण्याची मागणी केली होती. एवढेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात संविधानाच्या शिल्पकाराचा पुतळा बसवण्याची मागणी वकिलांनी यापूर्वी अनेकदा केली होती. खरे तर १९७० च्या दशकापासून ही मागणी होत होती. आता आंबेडकरवादी वकिलांच्या एका गटाने केलेल्या मागणीनंतर बाबासाहेबांचा पुतळा बसवण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. १९७० च्या दशकात राजकारणी, समाजसेवक आणि आंबेडकरांचे अनुयायी असलेल्या दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी जनतेला बाबासाहेबांचा पुतळा संसदेत बसवण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यानंतरची पुढील पाच दशकं हा संघर्ष या निमित्ताने सुरू राहिला, आणि जो आता पूर्णत्वास येत आहे, याचा प्रचंड आनंद होणे स्वाभाविक आहे.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणा घटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबरला संविधान दिनी राष्ट्रपती द्रोपर्दी मुर्मू यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण होत आहे. देशातील कोणत्याच न्यायालयाच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नाही. मात्र, आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात पुतळा विराजमान होणार आहे. आपल्याच देशात म्हणजे हरियाणातील मानेसर इथं पुतळ्यांचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे. प्रसिद्ध शिल्पकार नरेश कुमावत यांनी या पुतळ्याचे शिल्प तयार केले आहे. ७ फूट उंचीच्या या पुतळ्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वकिलाचा पोशाख आणि हातात संविधानाची प्रत धारण केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात समोरच्या हिरवळीवर आणि बागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात येत आहे. ब्रिटिश संसदेने भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव १५ जुलै १९४७ रोजी स्वीकृत केल्यानंतर ३ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे जाहीर झाली. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कायदे व न्यायमंत्री म्हणून नियुक्ती होती. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान समितीचे अध्यक्ष आणि कायदा व न्याय मंत्री अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत होते. १५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाल्यावर पंतप्रधान नेहरूंच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर १९४७ मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी पदाची शपथ घेतली होती. बाबासाहेबांनी सप्टेंबर १९४७ ते ऑक्टोबर १९५१ दरम्यान या पदावर कार्य केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय बहुआयामी विद्वान आणि तत्त्वज्ञ होते. ते न्यायशास्त्रज्ञ म्हणजेच कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक, लेखक, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेते होते. त्यांनी संविधान सभेतील मसुदा समितीचे नेतृत्व करून भारतीय संविधान निर्माण केले. त्यांनी पहिले केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री तसेच राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम केले. हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली. त्यांना १९९० मध्ये मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला होता. सुप्रीम कोर्टात बाबासाहेबांचा पुतळा स्थापन होणे ही अत्यंत महत्त्वाची आणि समस्त भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. आधुनिक भारताच्या शिल्पकाराचा हा एक राष्ट्रीय गौरव आहे.
दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की, संविधान दिनी २६ नोव्हेंबरलाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा १२५ फूट उंच पुतळा आंध्र प्रदेशच्या विजयवाडा शहरामध्ये स्थापन होत आहे. हा पुतळा जगातील सर्वात उंच बाबासाहेबांचा पुतळा असेल तसेच भारतातील सर्वात उंच पुतळ्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर असेल. जुन्या संसद भवन परिसरामध्ये सुद्धा बाबासाहेबांचा भव्य पुतळा उभा आहे. यासोबतच नवीन संसद भवनामध्ये सुद्धा वल्लभभाई पटेल यांच्यासोबत बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य भित्तीचित्र साकारण्यात आले आहे. दिल्लीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक पुतळे स्थापन करण्यात आले आहेत. परंतु या पुतळ्यांमध्ये संसदेतील पुतळा आणि सर्वोच्च न्यायालयातील पुतळा विशेष असणार आहे, हे निश्चित.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतातील कोट्यवधी उपेक्षित लोकांचे मुक्तिदाता म्हणूनच नव्हे तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणूनही आदरणीय आहेत. भारताच्या जडणघडणीत बाबासाहेबांचे योगदान अनमोल असे आहे. राष्ट्राची ही संकल्पना विकसित होण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मदत झाली. पण ‘राष्ट्रीयत्वा’ची भावना आपल्या देशात ती पूर्ण झालेली नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. स्वत:स राष्ट्र म्हणविणाऱ्या सर्व लोकांचा संवाद, सहभाग आणि भागीदारी यांतून आलेली सामाजिक एकोप्याची भावना म्हणजे राष्ट्रीयत्व.’ राष्ट्रभावनेत एकोपा किती आहे, हे सामाजिक जीवनात समता आणि बंधुता किती आहे, यावर ठरते.
देशात आर्थिक व सामाजिक पातळ्यांवर मोठी विषमता असताना आणि अलिकडच्या काळात आंतर-जातीय, वांशिक आणि धर्मीय तणाव वाढत असताना ‘राष्ट्र’ विकसित होण्यासाठी आणि राष्ट्रीयत्वाची भावना प्रत्यक्षात दिसण्यासाठी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून शिकवण घेतली पाहिजे. ‘एक व्यक्ती एक मूल्य’ किंवा सर्वाना समान मूल्य, हे लोकशाहीचे मूलभूत तत्त्व आहे. राजकीय लोकशाहीत ‘एक व्यक्ती एक मत’ या नियमाने हे तत्त्व आचारणात आणले जाते. पण राजकीय लोकशाही यशस्वी व्हायची असेल तर सामाजिक आणि आर्थिक पातळ्यांवरही सर्वाना समता आणि स्वातंत्र्य हवे. ‘सामाजिक आणि आर्थिक लोकशाही हे राजकीय लोकशाहीच्या पेशी आणि तंतूंसारखे आहेत’ असे त्यांचे मत होते.
परंतु जातिव्यवस्थेमुळे एकतर सामाजिक आणि त्यामुळे आर्थिक लोकशाही नाकारली जाते आणि राजकीय लोकशाहीचे स्वरूप जातीय किंवा जाती-आधारित बनते. म्हणून राजकीय लोकशाही बळकट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा, सामाजिक व आर्थिक लोकशाहीवर भर होता. त्याचप्रमाणे लोकशाही बळकट करण्यासाठी अहिंसक मार्गाचा वापर ही त्यांनी पूर्वअट मानली होती. ‘कोणत्याही रक्तपाताविना क्रांतिकारक बदल घडवून आणणारी शासनपद्धती म्हणजे लोकशाही’, असे बाबासाहेब म्हणतात. परंतु आज जातीनिहाय जमावाचा हिंसाचार वाढत असताना त्यांची शिकवण साऱ्यांनी घ्यावी, अशी वेळ आली आहे. अशा या महामानवाचे जगभरातून लक्षावधी पुतळे आणि स्मारके उभारण्यात आलेली आहेत. भारतात सर्वात जास्त पुतळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. हे पुतळे वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत आणि त्यांना त्यांचे विशेष महत्त्व सुद्धा आहे. तीन वेगवेगळ्या भारतीय राज्यांमध्ये बाबासाहेबांचे हे विशाल पुतळे आहेत, ज्यापैकी दोघांचे काम पूर्ण झाले आहे तर एकाचे काम अजून चालू आहे.
हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आतापर्यंतचे सर्वात उंच पुतळे आहेत. काम चालू असलेला पुतळा जेव्हा २०२६ मध्ये पूर्ण होईल, तेव्हा तो जगातील पहिल्या ५ सर्वाधिक उंचीच्या पुतळ्यांमध्ये स्थान प्राप्त करेल. समाजामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याबाबत साधारणतः दोन प्रवाह आहेत. निव्वळ पुतळे उभारुन काही होणार नाही तर त्याऐवजी ग्रंथालये आणि रुग्णालये उभारली पाहिजेत, असा एक प्रवाह आहे. तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य लोकांनी पुतळे बसवूनच येणाऱ्या पिढीला शिक्षण घेण्याची, संघटित होण्याची आणि हक्क अधिकारांसाठी लढण्याची प्रेरणा दिली. आजपर्यंत बाबासाहेब पुतळ्यांच्या स्वरूपात सतत आमच्या पाठीशी उभे राहिले. शाळा, महाविद्यालये, विद्यापिठे, ग्रंथालये किंवा रुग्णालये उभारलीच पाहिजेत पण त्यासमोर बाबासाहेबांचा भव्य पुतळा हवा, असा एक मतप्रवाह आहे. खरं तर फार पूर्वीच हे व्हायला हवे होते. आता बाबासाहेबांच्या साक्षीने राज्यघटनेवर चालणाऱ्या सर्वोच्च न्यायालयात न्यायनिवाडा होत राहील ही बाब कोण आनंद देणारी आहे!
– प्रज्ञाधर ढवळे, नांदेड. मो. ९८९०२४७९५३