जागतिक शौचालय दिनाच्या औचित्याने जिल्हयात स्वच्छता उपक्रम
नांदेड| 19 नोव्हेंबर 2023 रोजी जागतिक शौचालय दिन आहे. जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत राज्यातील गावे हागणदारीमुक्त अधिक होण्यासाठी व वैयक्तिक शौचालयाचा वापराबाबत जिल्हयात स्वच्छता उपक्रम राबवावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीण कक्षाने केले आहे.
संपूर्ण ग्रामीण स्वच्छता शाश्वत स्वरूपात टिकविण्याच्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत ग्रामीण भागातील सार्वजनिक शौचालय संकुलाचे बांधकाम, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, मैलागाळ व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अशाप्रकारे कामे पूर्ण करून गावे हागणदारीमुक्त अधिक म्हणून घोषित केली जात आहेत. या औचित्याने रविवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी जिल्हयात सर्व गावातून स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील ज्या कुटुंबांकडे शौचालय नाही अशा कुटुंबांना शौचालय देण्यासाठी केंद्र शासनाने ऑनलाइनद्वारे वैयक्तिक शौचालय मागणीची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. याची माहिती ग्रामस्थांना देवून नावे ऑनलाईन करणे व शौचालय बांधकाम करणे, यापूर्वी ज्यांनी एक खड्डयाचे शौचालय बांधलेले आहे अशा कुटूंबांना दुसऱ्या खड्ड्यांचे बांधकाम करावयास लावणे. जेणेकरून हे शौचालय त्यांना नियमित वापरता येईल. सार्वजनिक शौचालय बांधकाम व सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे करुन गाव शाश्वत स्वच्छ ठेवणे आदी उपक्रम गावपातळीवर राबवावेत.
सदर उपक्रमासंदर्भात गट विकास अधिकारी यांना पत्र पाठवून सूचना देण्यात आल्या आहेत. जागतिक शौचालय दिनानिमित्त स्वच्छतेचे उपक्रम यशस्वी करण्यासाठी नागरीकांनी मोठया प्रमाणात सहभाग घेवून गावे शाश्वत स्वच्छ करावीत असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले आहे.