नांदेड| मागील महिन्यात नांदेडच्या डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात मृत्यूच्या तांडवानं राज्यभरात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर नुकतीच एक घटना उजेडात आली असून, झाडाखाली विश्रांती घेत असलेल्या एका रुग्णाचे डुकराच्या कळपाने लचके तोडले असल्याने रुग्णाचा मृत्यू झाला आहे. येथे वावरणाऱ्या डुकरानी चक्क कमरेच्या खाली, दोन्ही गळासह नाकाचा भाग डुकरांनी फस्त केला हि घटना आज दि.११ रोजी उजेडात आली आहे. विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वीच या रुग्णाला डिस्चार्ज मिळाला होता असे सांगितले जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड तालुक्यातील धनगरवाडी येथील तुकाराम नागोराव कसबे वय ३५ वर्ष या रुग्णाला गेल्या अनेक वर्षांपासून टीबीचा आजार होता. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार केल्यानंतर दि.३० ऑक्टोबर रोजी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचार घेवून तो बराही झाला होता. त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. त्यानंतर त्याचे वडील नागोराव कसबे हे त्याला धनगरवाडी येथील आपल्या गावी घेवून गेले होते.
दि.१० नोव्हेंबर रोजी तुकाराम हा परभणी येथील काकाकडे जाण्यासाठी निघाला होता. त्याला दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास वडिलांनी नांदेड रेल्वे स्टेशनवर सोडले होते. परंतु तो परभणीला न जाता परत विष्णुपुरी येथील रुग्णालयात गेला. या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी देण्यात येत असलेले जेवणही त्याने केले. तसेच परिसरातील चिंचेच्या झाडाखाली विश्रांतीसाठी झोपला होता.
दरम्यान रात्रीच्या वेळी डुकरांच्या झुंडीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात तुकाराम यांच्या दोन्ही गालाचे, नाकाचे आणि कमरेखालच्या भागाचे लचके तोडण्यात आले. यामुळे त्यांचा मृत्यू झाला हा गंभीर प्रकार उघडकीस शनिवारी सकाळी उघडकीस आला. त्यानंतर नागोराव कसबे यांनी रुग्णालयात धाव घेतली. नांदेड ग्रामीण पोलिस स्टेशनला माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. या प्रकरणात पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मागील महिन्यात झालेल्या शासकीय रुग्णालय परिसरातील मृत्यूच्या तांडवानंतर या भागात शेकडोंच्या संख्येने डुकर असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे समोर आले होते. अनेकवेळा ही डुकरे रुग्णालयाच्या कक्षातही घुसतात. बाहेर थांबलेल्या नातेवाईकांवरही हल्ले करतात. रुग्णालयातील जैविकचरा हेच यांचे प्रमुख अन्न बनले असून, त्यामुळे हि डुकरे आक्रमक झाल्याचे यापूर्वीही दिसून आले होते. मात्र रुग्णालय प्रशासनाने या डुकरांचा बंदोबस्त केला नसल्याने हि घटना घडली असल्याचा आरोप अनेकवेळा मागणी करूनही डुकरांच्या बंदोबस्ताकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप केला आहे.