नांदेड| देगलूर वनपरिक्षेत्रातील स्थानिक अधिकारी-कर्मचारी यांच्या आर्थिक संगनमतातून राजरोसपणे चालू असलेली गडगा येथिल जय सेवालाल साॅ मिल या ठिकाणी विनापरवाना व बेकायदेशीर चालणारी आडवी आरा गिरणी अखेर उद्ध्वस्त करण्याची धाडसी कारवाई नांदेडच्या वनविभागाचे सहा.वनसंरक्षक बि.एन.ठाकूर यांनी दिनांक ३ नोव्हेंबर रोजी समक्ष केली असल्याने त्यांच्या या निर्णयासह रात्री उशिरापर्यंत चालू असलेल्या या थेट कारवाईमूळे आपल्यावरही गंडांतर येणार असल्याच्या धास्तीनेच संबंधित दोषींची पाठराखण करणाऱ्या स्थानिक अधिकारी-कर्मचारी यांच्यात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.
नांदेडच्या वनविभागामध्ये कार्यरत सहा.वनसंरक्षक बि.एन.ठाकूर यांना देगलूर वनपरिक्षेत्र अंतर्गत नायगांव (खै.) तालुक्यातील गडगा येथे जय सेवालाल साॅ मिल या ठिकाणी आडवी आरा गिरणी विनापरवाना व बेकायदेशीरपणे सुरु असल्याची खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याबाबत शहनिशा करुन घेऊन दिनांक ३ नोव्हेंबर रोजी देगलूर वनपरिक्षेत्रातील क्षेत्रीय कामांच्या तपासणीदरम्यान गडगा येथे आपला मोर्चा वळविला.सोबतीला नांदेडच्या फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड व त्यांचे सहकारीही होते त्यांनी येथील जय सेवालाल साॅ मिल याठिकाणी वृक्षतोड साठा व उभी आरा गिरणी तपासणी दरम्यान त्यांना प्राप्त माहितीनुसार आडवी आरा गिरणीही सुरु असल्याचे आढळून आले.
याबाबत साॅ मिलच्या संबधितांसह स्थानिक वन अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतरही ते निरुत्तर झाल्याने सदरची आडवी आडवी आरा गिरणी विनापरवाना व बेकायदेशीरपणे सुरु असल्याची खात्री पटताच वरिष्ठांना याबाबतीत तातडीने अवगत करुन देत सहा.वनसंरक्षक ठाकूर यांनी सदरची आडवी आरा गिरणीच उद्ध्वस्त करण्याचा धाडसी निर्णय घेतला व त्याठिकाणी लगेच जेसीबी यंत्र मागवून घेत समक्षच सदरची आरा गिरणी उद्ध्वस्त केली सदरील प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरुच होती. सदरची कारवाई वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक ठाकूर यांच्यासह फिरते पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड, वनपाल आनोले,वाहनचालक मिलींद प्रधान,जाधव आदींचा समावेश असलेल्या पथकांकडून करण्यात आली.
यावेळी देगलूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निखील हिवरे,नरसी वनपरिमंडळाचे वनपाल गुरुपवार व स्थानिकचे वनरक्षक, वनमजूर उपस्थित होते. या ठिकाणी वनविभागाकडून सुरु असलेल्या कारवाईची माहिती प्रत्यक्षदर्क्षीसह स्थानिकच्या वनप्रेमींकडून मिळाल्यानंतर अधिक माहितीसाठी आमच्या प्रस्तुत संपर्क साधला असता सदरच्या सुरु असलेल्या कारवाईबाबत सहाय्यक वनसंरक्षक ठाकूर यांनी दुजोरा दिला.
वनविभागातील वरिष्ठांकडून या साॅ मिल मधील कटईसाठी आलेल्या वृक्षतोड,साठा तपासणी पाठोपाठ येथे बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या आडवी आरा गिरणी प्रकरणात सदरच्या साॅ मीलचा उभी आरा गिरणी परवाना रद्द व साॅ मिल सील करण्याची तसेच,संबधित दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. सोबतच,संबधित दोषींसह त्यांना पाठीशी घालून कर्तव्यात कसूर केल्याने देगलूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी,नरसी वनपरिमंडळाचे वनपाल यांच्यासह स्थानिकचे वनरक्षक,वनमजूरांवरही कायदेशीर कारवाई करण्याची गरज असल्याच्या संतप्त भावना या भागातील अनेकांतून व्यक्त होत आहेत.
उपवनसंरक्षक वाबळे यांच्या भूमिकेकडे लक्ष !
महत्वाचे म्हणजे यापूर्वी सहा.वनसंरक्षक ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून नायगांव तालुक्यातील अनाधिकृत वृक्षतोड,साठा प्रकरणात दोषींविरुद्ध थेट कारवाई करण्यांत आलेली होती परंतू, त्यांच्याकडून प्राप्त अहवालासह वनप्रेमींच्या तक्रारीनंतरही या प्रकरणात दोषींसह त्यांना पाठीशी घालीत कर्तव्यात कसूर केल्याबाबत स्थानिक वन विभागातील अधिकारी- कर्मचारी यांच्यावर अद्यापही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नसल्याने या प्रकरणातही संबधितांवर आगामी काळात कारवाईबाबत संशय निर्माण होत असल्याने यावर उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या कर्तव्यतत्परतेसह त्यांच्या भूमिकेकडे वनप्रेमींचे लक्ष लागून आहे.
सामाजिक वनीकरणासह वनविभाग ठरतोय बहुचर्चित !
विशेष बाब म्हणजे वृक्षलागवड,संगोपन आदी विविध कामांतील गैरव्यवहाराबाबत नांदेडच्या सामाजिक वनीकरण विभागातील सहा.वनसंरक्षक तथा,तत्कालीन प्रभारी विभागीय वन अधिकारी आशिष हिवरे यांच्यासह भोकर, हदगांव- हिमायतनगर तालुक्यातील अनेक अधिकारी- कर्मचारी यांना कारवाईला सामोरे जावे लागल्याने सर्वदूर हा विभाग चांगलाच बहुचर्चित ठरलेला असून तोच कित्ता आता वनविभागात गिरविला जात आहे. सामाजिक वनीकरण विभागातील गैरव्यवहार तपासणी व चौकशीदरम्यान येथिल विभागीय वन अधिकारी पदाचा कार्यभार वनविभागाचे उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्याकडे सोपविण्यात आलेला होता.त्यांच्या कार्यकाळात चक्क चौकशीदरम्यान भर उन्हाळ्यात हदगांव- हिमायतनगर तालुक्यात अनेक ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आल्याचे आढळून आल्याने चौकशी पथकांकडून प्राप्त अहवालानंतरच वरिष्ठांकडून संबधित दोषींविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली.
परंतू,त्याचवेळी यासाठी दोषींसह त्यांची पाठराखण करणारे तत्कालीन प्रभारी विभागीय वन अधिकारी वाबळे यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नव्हती यासह थकित वेतनासाठी वनविभाग कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या एका वनकामगार महिलेच्या मृत्यूनंतरही कारवाई टळली असल्यानेच उपवनसंरक्षकावर थेट वरिष्ठांकडून मेहरनजर असल्याने या विभागातही वृक्षतोड,साठा व विविध कामांत गैरव्यवहार होत असल्याची चर्चा असून नांदेडमध्ये सामाजिक वनीकरण विभागापाठोपाठ वनविभागही चांगलाच बहुचर्चित ठरत असल्याचे बोलल्या जात आहे.