दिपावली निमित्त गावी जाणाऱ्या नागरिकांना नांदेड पोलिसांनी केलं आवाहन
नांदेड,अनिल मादसवार| जनतेची सुरक्षा हीच आमची दिवाळी मानून पोलिस प्रशासन चोख कर्तव्य बजावत आहेत. जनतेच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी दिवाळीनिमित्त गावी जाताना आपल्या मौल्यवान वस्तूची कशी सुरक्षा करावी यासाठी आवाहन केलं आहे. सर्व जनता आनंदित तर आमची दिवाळी आनंदित जाईल, जणू अशा भावना पोलिस प्रशासन व्यक्त करत असल्याचे दिसते आहे.
नांदेड पोलीस दलातर्फे सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, सध्या दिपावलीचा सण आल्याने बरेच जण आपआपले गावी जातात. गावी जातांना आपल्या घराला कुलूप लावुन जातात. परंतु सदरील बंद घराचा फायदा घेवुन चोरटे सदरील ठिकाणी चोऱ्या करतात. तरी चोरी, घरफोडी सारख्या घटना घडू नये या करीता खालील उपाययोजना कराव्यात आणि आपल्या मालमत्तेची काळजी घ्यावी असं कळविले आहे.
जे नागरिक आपल्या गावी दिपावली सण साजरा करण्यासाठी जात असतात त्यांनी गावी जाताना आपले कडील सर्व प्रकारचे दागीणे, पैसे, मौल्यवान वस्तु हया घरी न ठेवता स्वतः सोबत घेवुन जावे किंवा बँकेचे लॉकर मध्ये सुरक्षित ठेवावे. बंद घरात वस्तु ठेवु नये, गावी जात असतांना शेजाऱ्यांना कल्पना देवुन जावे तसेच पोलीस स्टेशनला सुध्दा येवुन कळवावे.
13 ते 4 घरांनी मिळुन एखादा गुरखा नेमावा. रात्रगस्तवरील पोलीस कर्मचारी यांचेशी संपर्क साधुन त्यांचे मोबाईल क्रमांक घेवुन ठेवावे किंवा डायल 112 वर कॉल करावा. आपले कॉलनी किंवा परिसरात संशयितरित्या एखादा व्यक्ती फिरत असल्यास तात्काळ डायल 112 वर संपर्क करावा.
गावी जात असतांना उच्च प्रतीचे कुलूप दरवाज्यास लावावे किंवा अलार्मसारखी एखादी बेल दरवाज्यास वसउन जावे. गावी जातांना घरातील, परीसरातील सर्व लाईट चालू ठेवावे. आपले कॉलनीतील परिसरातील फेरीवाले, किरकोळ विक्री करणारे आल्यास त्यांचे आधार कार्ड तपासावे, तो व्यक्ती स्वतःची ओळख लपवत असेल तर पोलीसांना संपर्क करावा. पोलीस मदतीसाठी आपत्कालीन क्रमांक डायल ११२ करावा असे आवाहन नांदेड पोलिसांनी केलं असल्याचं पत्रक जनसंपर्क अधिकारी पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड यांनी जारी केला आहे.