tractor trolley falls into well : आलेगाव येथे ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडल्याने 7 शेतमजूर महिलांचा मृत्यू तर 3 जखमी
• प्रशासनाकडून तातडीचे मदत कार्य • प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

नांदेड, अनिल मादसवार| नांदेड तालुक्यातील आलेगाव येथे आज सकाळी महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेत 7 शेतमजुर महिलांचा मृत्यू झाला तर 3 शेतमजुर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची प्रधानमंत्री व मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने नोंद घेतली आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर करण्यात आले आहे.
वसमत तालुक्यातील गुंज या गावातील 10 शेतमजुर नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात शेत गट क्र 201 मध्ये भुईमुग निंदनीच्या कामासाठी ट्रॅक्टरने जात होते. या शेतात कडघरा नसलेल्या दगडोजी लक्ष्मण शिंदे यांच्या शेतात पाण्याने भरलेल्या विहिरीत ट्रॅक्टर हेड व ट्रॉली सहीत 10 मजुर आज सकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान पडल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे.
या दुर्घटनेत जिवंत सुखरुप बाहेर काढण्यात आलेल्यामध्ये श्रीमती पार्वतीबाई रामा भुरड (वय 35), श्रीमती पुरभाबाई संतोष कांबळे (वय 40), सटवाजी जाधव (वय 55) या शेतमजुरांचा समावेश आहे. तर मृत्तांमध्ये श्रीमती ताराबाई सटवाजी जाधव (वय 35), धुरपता सटवाजी जाधव (वय 18), सिमरण संतोष कांबळे (वय 18), सरस्वती लखन भुरड (वय 25), श्रीमती चऊत्राबाई माधव पारधे (वय 45), श्रीमती सपना/मिना राजु राऊत (वय 25), श्रीमती ज्योती इरबाजी सरोदे (वय 30) या महिलांचा समावेश आहे.
यावेळी पोलीस प्रशासन व नांदेड वाघाळा मनपाचे शोध व बचाव पथकाचे कर्मचारी, स्थानिक कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने सदर शोध व बचाव कार्य संपन्न झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताचे वृत्त ऐकूण तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. तातडीच्या मदतीची घोषणा केली. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून रुपये पाच लक्ष एवढे अर्थसहाय जाहीर केले. प्रधानमंत्री कार्यालयाने देखील या दुर्घटनेची त्वरेने दखल घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. सोबतच प्रधानमंत्री कार्यालयामार्फत प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृत्तांच्या कुटुंबियांना 2 लक्ष रुपये तर जखमींना 50 हजाराची मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेने समाज मन हेलावून गेले आहे. मृत्त सात जणांमध्ये पाच महिला व दोन मुलींचा समावेश आहे. घटनाक्रम यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.
सकाळी प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांचे विशेष पथक, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वारकड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे यांच्यासह महसूल विभागाचे क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी दुर्घटनेत शोध व बचाव कामासाठी तातडीने उपस्थित झाले होते.
जिल्ह्याभरातील कठडे नसलेल्या विहिरींची नोंद करण्याचे आदेश
आजच्या अपघातामध्ये सात निष्पाप जीवांचे बळी गेल्यामुळे अशा अपघात प्रवण किती विहिरी जिल्ह्यामध्ये आहेत त्यांचा शोध घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित यंत्रणेला सूचना दिली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली तसेच निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांना या संदर्भात सर्व यंत्रणेकडून याबाबतचा अहवाल मागितला आहे. नागरिकांनी अशा धोकादायक रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरींबाबत सतर्कता बाळगावी व विहिरीचे मालक असणाऱ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीने दुर्घटना होणार नाही यासंदर्भात अडथळे उभारावेत अशी सूचनाही त्यांनी दिली आहे.
