१८वे लोकसंवाद साहित्य संमेलन रविवारी : श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उद्घाटन; पृथ्वीराज तौर संमेलनाध्यक्ष
नांदेड| राज्याच्या मराठी साहित्य संमेलनात अत्यंत सन्मानपूर्वक ओळखल्या जाणाऱ्या लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचा १८ वा राज्यस्तरीय साहित्य सोहळा येत्या रविवारी दि. १० डिसेंबर रोजी उमरी येथे पार पडणार आहे. संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार असून पृथ्वीराज तौर हे संमेलनाध्यक्ष असतील, तर स्वागताध्यक्ष म्हणून विक्रम देशमुख तळेगावकर हे मान्यवरांचे स्वागत करतील. दि. १० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरूवात
होईल. ग.पि. मनूरकर व्यासपीठावर सकाळी १०.३० वाजता मुख्य उद्घाटन सोहळा पार पडेल. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. पृथ्वीराज तौर अध्यक्षीय भाषण करतील. या साहित्य संमेलनाला विशेष अतिथी म्हणून शिक्षक आमदार विक्रम काळे, आ. राजेश पवार, पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांची उपस्थिती राहणार आहे. याचवेळी स्वाती कान्हेगावकर लिखित ‘झाड एक मंदिर’ या कुमार कादंबरीचे प्रकाशन होईल. लोकसंवाद पुरस्कारांचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते पार पडेल.
दुपारी २.३० वाजता माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘शेतकऱ्यांच्या आदिम दुःखाला जबाबदार कोण?’ या विषयावर परिसंवाद होईल. माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, डॉ. जगदीश कदम हे परिसंवादात सहभागी होतील. दुपारी ४ वाजता विलास ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या कथाकथनात डॉ. शंकर विभुते, राम तरटे, स्वाती कान्हेगावकर, अनुपमा बन, बालाजी पेटेकर हे कथा सादर करतील. सायंकाळी ५.३०
वाजता प्रा. शंकर राठोड यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन रंगेल. श्री यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा ता. उमरी जि. नांदेडच्या वतीने उमरी येथील बापूसाहेब देशमुख गोरठेकर साहित्यनगरी, गिरीष गोरठेकर इंग्लिश स्कूल संलग्नित विद्याभारती ज्युनिअर कॉलेज उमरी येथे पार पडणाऱ्या १८ व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनास साहित्यप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक दिगंबर कदम यांनी केले आहे.
लोकसंवाद २०२३ चे मानकरी
लोकसंवाद साहित्य संमेलनाच्या वतीने विविध मान्यवरांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात येतो. लोकसंवाद २०२३ चे मानकरी स्व. आर. आर. पाटील स्मृती पुरस्कार प्राचार्य कै.ग. पि. मनूरकर गुरुजी यांना मरणोत्तर प्रदान करण्यात येईल. ग.शं. चिटमलवार यांना जीवनगौरव, डॉ. वीणा कदम यांना उत्कृष्ट कादंबरी लेखक, शिवाजी धर्माधिकारी सामाजिक पुरस्कार, डॉ. रामकृष्ण बदने शैक्षणिक, डॉ. अजय क्षीरसागर शैक्षणिक, भीमराव राऊत अनुवाद, डॉ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार काव्य, डॉ. बबिताकौर चहल ग्रंथ चळवळ, साईनाथ चंदापुरे शैक्षणिक, अनुरत्न वाघमारे काव्य तर माधवराव ईळेगावकर यांना आध्यात्मातील योगदानाबद्दल गौरविण्यात येणार आहे.