बिलोली, गोविंद मुंडकर| १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलींसोबत जबरदस्तीने लग्न करून त्या मुलींसोबतशारीरिक संबंध ठेवणा-या धर्माबाद तालुक्यातील बाभळी येथील आरोपीस बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयांचे न्यायाधीश दिनेश ए. कोठलीकर यांनी दि.१ मार्च रोजी दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सदर घटनेतील पिडीत १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या आई व इतर नातेवाईकांनी धर्माबाद तालुक्यातील मौजे बाभळी येथील रहिवासी असलेल्या बालाजी महादु संत्रे ह्याच्यासोबत १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे दि. ०६ मार्च २०२२ रोजी बळजबरीने लग्न लावून दिले.लग्नानंतर आरोपी क्र. १ बालाजी महादु संत्रे याने पिडीत मुलीच्या ईच्छे विरुद्ध तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले असल्याची तक्रार पिडीत मुलीने दाखल केली. पिडीत मुलीच्या तक्रारी वरून आरोपी बालाजी महादु संत्रे व इतर ४ नातेवाईकांविरूद्ध कलम ३७६(२)(n) भादवी व कलम ४,६,८,१२ पोक्सो अंतर्गत गु. र. नं १११/२०२२ नुसार धर्माबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरील विषेश खटला बालसंरक्षण क्र.१६/२०२२ मध्ये सरकार पक्षातर्फे एकुण सात साक्षीदार तपासण्यात आले.न्यायालयासमोर आलेल्या साक्षीपुराव्याचा विचार करून बिलोली येथील जिल्हा न्यायाधीश वर्ग १.तथा अति. जिल्हा सत्र न्यायाधीश दिनेश ए. कोठलीकर यांनी अरोपीस बालाजी संत्रे यास दहा वर्षाची सक्तमजुरी व दहा हजार रूपये दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणी सरकारी पक्षातर्फे ॲड. संदीप कुंलवाडीकर यांनी बाजू मांडली