भाउबीज निमीत्त आंदोलनकर्त्या महिलांनी केले ग्रामविकास मंत्र्यांचे औक्षण
नांदेड। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असणारे करार तत्वावरील कंत्राटी कर्मचारी मागील २० वर्षापासुन सेवारत असून या कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समायोजन करावे या प्रमुख मागणी साठी २५ ऑक्टोबर २०२३ पासुन बेमुदत धरणे आंदोलन येथील जिल्हा परिषदेसमोर अखंडपणे चालु आहे .
लेखी स्वरुपात मागण्या मान्य होईपर्यंत सदर आंदोलन स्थगीत करण्यात येणार नसून यात भर म्हणून काल दिनांक १६ नोव्हेंबर पासून महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन चे राज्य संघटक तथा समायोजन कृती समिती महाराष्ट्र राज्यचे जिल्हा नोदेडचे मुख्य समन्वयक संजय देशमुख हे नांदेड जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणास बसले असून याच प्रकारे प्रत्येक जिल्हास्तरावर एक व्यक्ती उपोषणास बसण्याच्या तयारीत असून या आंदोलनाचे स्वरूप आक्रमक होणार असल्याचे दिसून येत आहे .
बेमुदत धरणे आंदोलनाचा एक भाग म्हणून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त उपस्थित राहिलेल्या ग्रामविकास व पंचायत राज पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांना स्वाती मानकर , मनिषा खंदारे , प्रियंका कांबळे , आम्रपाली भगत , लक्ष्मी राऊत , हर्षणा भगत आदिंनी औक्षण करून भाऊबीजेची भेट म्हणून शासनाने सेवेत कायम करावी ची मागणी किनवट येथे केली.
संजय देशमुख यांनी सांगितले की संपूर्ण महाराष्ट्रात आता हा लढा व्यापक झाला असून शासनाने त्वरित मागणी मान्य न केल्यास आरोग्य सेवा ठप पडल्या वाचून राहणार नाही आणि याची सर्व जिम्मेदारी शासनावर असणार आहे .ही गंभीर परिस्थिती उद्भवू होऊ नये म्हणून आरोग्य मंत्र्यांनी आझाद मैदान येथे आंदोलन करताना शासन सेवेत कायम करण्याचे तोंडी आश्वासन लेखी स्वरूपात उतरवून आंदोलन समाप्तीच्या दृष्टीने योग्य ते पाऊले उचलावी असेही आवाहन त्यांनी केले .
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. जगदीश राठोड ,जिल्हाध्यक्ष डॉ.सोमेश्वर मारावार , डॉ. दिक्षा कांबळे ,आरबीएसके संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अमोल भंडारे ,सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचीन मुंडे , सचिव सय्यद अयुब ,कुष्ठरोग कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष डांगरे व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असणारे कंत्राटी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करण्याचा चंग बांधला .