ग्रामीण भागात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजनांचा जागर
नांदेड| शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांसाठी पात्रता असूनही ज्या लोकांना विकासाच्या प्रवाहात येता आले नाही त्यांना शासकीय योजनांचा विविध लाभ मिळावा या उद्देशाने हाती घेतलेल्या विकसित भातर संकल्प यात्रेला जिल्ह्यातील ग्रामीण भागात लोकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अनेक योजनांची माहिती लोकांपर्यंत व्यवस्थीत न पोहचल्याने त्यांच्या मनात अनेक योजनांबाबत संभ्रम असतो. तो संभ्रम दूर व्हावा, त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे आणि योजनांच्या पात्रतेविषयी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पुर्तता करता यावी असा उद्देश घेऊन योजनांची प्रचार, प्रसिद्धी व्हावी यादृष्टिने विकसित भारत संकल्प यात्रा हाती घेण्यात आली आहे.
12 डिसेंबर रोजी या गावात विकसित भारत संकल्प यात्रा
विकसित भारत संकल्प यात्रा उद्या 12 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव, खैरगाव बु.. भोकर तालुक्यातील आमदरी, वाकड. बिलोली तालुक्यातील गळेगाव, बेळकोणी खुर्द, टाकळी खुर्द. देगलूर तालुक्यातील वझर. कंधार तालुक्यातील दहिकळंबा, दाताळा. किनवट तालुक्यातील कनकवाडी, माळबोरगाव. लोहा तालुक्यातील खेडकरवाडी, पोलीसवाडी. माहूर तालुक्यातील मालकागुडा. मुखेड तालुक्यातील सांगवी महादेव. नायगाव तालुक्यातील लालवाडी, वजीरगाव, टाकळी (टीबी), नांदेड तालुक्यातील जैतापूर. उमरी तालुक्यातील निमटेक आदी गावांमध्ये ही यात्रा जाणार आहे. या यात्रेसमवेत पंचायत समिती अंतर्गत अधिकारी-कर्मचारी असतील.
या मोहीमेत आरोग्य, कृषी, आवास, आयुष्यमान भारत, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, पीएम विश्वकर्मा, जन धन योजना, अटल पेन्शन योजना, बीमा योजना, पीएम पोषण अभियान, दिनदयाल अंत्योदय योजना आदीचा समावेश आहे. तसेच आदीवासी विभागासाठी विशेष योजना, स्कॉलरशिप योजना, वंदन योजना, उज्वला योजना, उजाला योजना अशा विविध विभागाच्या योजनाचा यात समावेश असणार आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनाचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.