अधिस्विकृती पत्रिका अधिकाधिक पत्रकारांना मिळावी यासाठी यातील काही अटी शिथील करण्याची शिफारस करणार-विभागीय अध्यक्ष विजय जोशी
नांदेड। अधिस्विकृती पत्रिका पत्रकारांना मिळावी यासाठी यातील जाचक अटी कमी करुन ही प्रक्रिया पारदर्शी करण्यासाठी व सुटसुटीत करण्यासाठी शासनाच्या वतीने सर्व संबंधित वरिष्ठ अधिकार्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत व जास्तीत जास्त पत्रकारांना अधिस्विकृती पत्रिका मिळावी यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशा भावना अधिस्विकृती समितीचे लातूर विभागीय अध्यक्ष दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी तथा पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
तब्बल २५ वर्षानंतर नांदेड येथे लातूर विभागीय अधिस्विकृती समितीची पहिली बैठक काल नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीला अधिस्विकृती समितीचे सदस्य प्रल्हाद उमाटे, नरसिंह घोणे, अझरोद्दीन रमजान शेख, अमोल अंबेकर, लातूर विभागाच्या माहिती उपसंचालक डॉ.सुरेखा मुळे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, प्रभारी हिंगोली जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी, धाराशिवचे जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सहाय्यक संचालक डॉ. श्याम टरके, सहाय्यक संचालक तानाजी घोलप, उपसंपादक रेखा पालवे आदी उपस्थित होते.
सुरुवातीला नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सर्व सन्माननीय सदस्य व उपस्थित अधिकार्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. परिषदेचे विभागीय संघटक प्रकाश कांबळे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी, कार्याध्यक्ष संतोष पांडागळे, सरचिटणीस राम तरटे आदींनी यासाठी पुढाकार घेतला.
या बैठकीत राज्य समितीकडे एकूण ११ प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले. तर कागदपत्रांच्या पूर्तता न झाल्याने तीन प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. विभागीय समितीच्या या बैठकीत अधिस्विकृती पत्रिका देताना दरवर्षी कागदपत्रे व अन्य बाबींची पूर्तता करण्याची आवश्यकता आहे काय, दोन वर्षांचे नुतनीकरण होत असताना सदरची कागदपत्रे दरवर्षी देण्याऐवजी दोन वर्षाला एकदा देण्याबाबत आग्रह धरण्यात यावा, किंवा नुतनीकरण एक वर्षाचेच करुन दरवर्षी कागदपत्रे मागवावी, असा ठराव समितीचे सदस्य प्रल्हाद उमाटे, नरसिंह घोणे यांनी मांडला.
त्यास अझरोद्दीन शेख व अमोल अंबेकर यांनी अनुमोदन दिले. त्यांनी मांडलेल्या प्रस्तावास अध्यक्ष विजय जोशी यांनी संमती देवून तसा प्रस्ताव राज्य समितीकडे पाठविला आहे. विभागीय उपसंचालक सुरेखा मुळे यांनी अधिस्विकृती समितीच्या वेगवेगळ्या अध्यादेशासंदर्भात व नव्या अटीसंदर्भात सदस्यांना अवगत केले. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना विजय जोशी म्हणाले की, लातूर विभागात असलेल्या नांदेड, हिंगोली, धाराशिव व लातूर या चारही जिल्ह्यातील पत्रकारांची कार्यशाळा लवकरच घेवून अधिस्विकृतीच्या संदर्भात असलेली नियमावली तसेच कागदपत्रांची पूर्तता यासाठी त्यांना अवगत केले जाईल. ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी व अधिकाधिक पत्रकारांना अधिस्विकृती पत्रिका मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. काही जाचक अटी यातील शिथिल कराव्यात, अशी सूचनाही शासनाकडे करण्यात येईल.