हिमायतनगर ,अनिल मादसवार। हिंगोली लोकसभेच्या निवडणूकीत हदगाव हिमायतनगर विधानसभेचे दोन दिग्गज उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढले. या दोघांच्या मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने देखील टक्कर दिली आहे. दि.२६ तारखेला मतदान झाले असून, उमेदवाराचे भविष्य इव्हीएम मशिन मध्ये बंद झाले आहे. हिंगोलीत कोण जिंकणार..? विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा आता वेगाने होवू लागली आहे. दोघांपैकी कोणीही जिंकला तर खासदारकीचा सातबारा हदगाव, हिमायतनगरच्या नावानेच असणार आहे, जर दोघांनाही धक्का देऊन वंचितांने जागा जिंकल्यास दोघांनाही घरी बसावे लागणार असल्याच्या चर्चेने रान उडविले आहे. सोशल मीडियावर जो तो आपलाच उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा जाताना पाहावयास मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात हिंगोली लोकसभा मतदार संघात २६ एप्रिलला प्रत्यक्षात मतदान झाले. या निवडणुकीसाठी शिवसेना उबाठा गट, काँग्रेस मित्र पक्ष महाविकास आघाडीकडून हदगाव, हिमायतनगर विधान सभेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ही निवडणूक लढविली. तर शिवसेना शिंदे गट, भाजपा मित्र पक्ष महायुतीकडून हदगाव, हिमायतनगर विधान सभेचे नेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी ही निवडणूक लढविली.
विशेष असे की, गेल्या विधान सभा निवडणूकीत हदगाव हिमायतनगर विधान सभा मतदारसंघातून या दोन्ही दिग्गज उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. मुळ शिवसेनेने नागेश पाटील आष्टीकर यांना अधिकृत उमेदवारी दिली. परंतू नाराजी नाट्यातून बाबुराव कदमांनी अपक्ष निवडणूक लढविली. कोहळीकर लक्षवेधी उमेदवार म्हणून उदयास आले. क्रमांक दोनची मते त्यांना मिळाली. तर आष्टीकर तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा या म्हणी प्रमाणे काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी ती निवडणूक जिंकली होती.
आता गेल्या विधान सभेत पराभूत झालेले उमेदवार हे एकमेकांच्या विरोधात हिंगोलीत लढले. या मतदार संघात वंचित बहुजन आघाडीकडून बी. डी. चव्हाण उमेदवार होते. तेही लक्षवेधी उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. या ठिकाणची निवडणूक तिरंगी मानली जात होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः बाबुराव कदम यांच्या उमेदवारीचे नामनिर्देशन पत्र दाखल करायला उपस्थित राहीले. त्यांनी हदगाव, वसमत, व तसेच इतर ठिकाणी सभा घेऊन वातावरण निर्मिती केली. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी व सिने अभिनेता गोविंदा यांच्याही प्रचार झाल्या. किनवट येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली.
हिमायतनगर येथे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची सभा झाली. प्रचारात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात आल्या, तर शिवसेना उबाठा कडून माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांच्या हदगाव, उमरखेड, व इतर ठिकाणी सभा झाल्या, काँग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांच्या नेत्यांनीही जोरदार प्रचार केला. तर वंचितकडून बि. डी. चव्हाण यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे मुख्य नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी ही ठिक ठिकाणी सभा घेवून प्रचारात आघाडी घेतली. आता मतदान संपल्यानंतर निवडून येणार कौण? या विषयीची उत्सुकता तानली जात आहे.
महाविकास आघाडी व महायुती यांच्या दोन उमेदवारात सरळ सरळ लढत झाली असे काही जन ठामपणे सांगत आहेत. तर यात वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार बी डी चव्हाण हे देखील मोठे मताधिक्याने निवडून येतील असा दावा त्यांच्या समर्थकांतून केला जात आहे. जर वंचितचे उमेदवार निवडून आला तर हिंगोलीचा धक्कादायक निकाल ठरू शकतो, आणि उबाठा किंवा शिंदे गटाचे उमेदवार निवडून आल्यास हिंगोलीच्या खासदारकिचा सातबारा मात्र हदगावच्याच नावाने राहील. असा अंदाज सध्यातरी मोठ्या प्रमाणात बांधला जात आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पैजा लागल्या असून, कोण निवडून येतो यासाठी मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा करावी लागणार एव्हढे मात्र निश्चित आहे.