नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारणे, विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती वाढविणे व त्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे हे विद्यापीठाचे ध्येय असून त्याचाच एक भाग म्हणून आज दि.२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता नांदेड शहरातील दोन प्रख्यात महाविद्यालयांना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी अचानक भेट दिली.

यावेळी त्यांच्यासमवेत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, मान्यवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग खडके, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. डी. एम. खंदारे, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर आणि नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर यांची उपस्थिती होती.

महाविद्यालयास भेट दिली असता तेथील परिस्थिती विदारक होती. महाविद्यालयाच्या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य असल्याचे निदर्शनास आले. महाविद्यालयाचे प्राचार्य, काही प्राध्यापक आणि विद्यार्थी अनुपस्थित होते. तर वेळापत्रकामध्ये दर्शविलेल्या तासिका चालू नसल्याचे निदर्शनास आले. प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा हजरीपट देखील तयार नव्हता. काही तास सुरू होते पण वर्गामध्ये एक किंवा दोन विद्यार्थी उपस्थित असल्याचे आढळून आले.

या भेटी दरम्यान स्वतः कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित झाल्यानंतर एकत्र व स्वातंत्रपणे सविस्तर चर्चा करून ते करीत असलेले शैक्षणिक कार्य, वेळापत्रकाचे नियोजन, हाती घेतलेले शैक्षणिक वैविध्यपूर्ण उपक्रम, महाविद्यालयातील विविध समिती त्यांचे कार्य अहवाल इत्यादी बाबत माहिती जाणून घेतली. नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाविद्यालयाची तयारी किंवा ते करत असलेली कार्यवाही याबाबत देखील माहिती घेतली.
त्यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यासोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी, महाविद्यालयाकडून पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, तासिका व प्रयोगशाळा इत्यादीचे वेळापत्रक बाबत सविस्तर माहिती घेतली असून वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश यावेळी कुलगुरूंनी संबंधीतांना दिले. भविष्यात देखील अशाच प्रकारे विविध महाविद्यालयांना आकस्मित भेटी देणार असल्याचे सूचित केले आहे.
