नांदेड| ज्ञानार्जनासोबतच सुसंस्कृत तथा समाजाचा एक आदर्श घटक असलेला विद्यार्थी घडावा. तसेच अमुलाग्र बदल घडवणारे बहुआयामी विद्यार्थी विद्यापीठातून तयार झाले पाहिजे, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे यांनी व्यक्त केले. माध्यमशास्त्र संकुलात आयोजित पालक मेळाव्यात अध्यक्षस्थानी त्या बोलत होत्या.
यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, मानव्य विद्याशाखेच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलजा वाडीकर, माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर, सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. जी. एस. येळणे, भाषा, वाड्मय व संस्कृती अभ्यास संकुलाचे संचालक डॉ. रमेश ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना डॉ. माधुरी देशपांडे म्हणाल्या की, काळाची पावले ओळखून केंद्र सरकारने नवीन शिक्षण धोरणाला मंजुरी दिली आहे. कौसल्याधिष्टीत अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी वळून स्वतःला सिद्ध केलं पाहिजे, तरच विद्यार्थी आजच्या स्पर्धेत टिकेल. आणि यासाठी पालकांनी देखील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडण्याची संधी दिली पाहिजे, असेही डॉ. माधुरी देशपांडे म्हणाल्या.
‘नवीन शिक्षण धोरण: स्वरूप आणि संधी’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. एम. के. पाटील म्हणाले की, नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीतून विद्यार्थी हे सुसंस्कृत नागरिक म्हणून घडणार आहेत. प्रगल्भ राष्ट्र म्हणून भारत साकारला जाणार आहे. यासाठी संविधान हा अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून अभ्यासला जाणार आहे. या शिक्षण धोरणात विद्यार्थ्यांच्या गतिनुसार विषय निवडण्याची सुविधा आहे, यामुळे विद्यार्थ्यांना अनेकानेक संधी मिळणार असल्याचे डॉ. पाटील यांनी विवेचन केले.
विद्यार्थ्यांच्या विकासात शिक्षकांसोबतच पालकांची भूमिका देखील महत्त्वाची आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना मानसिक आधार देणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. जी. एस. येळणे यांनी केले. यावेळी डॉ. रमेश ढगे बोलतांना म्हणाले, की जो माध्यमांना नियंत्रित करतो तो लोकांच्या मतांना, धारणांना नियंत्रित करत असतो आणि असे जेंव्हा होते तेंव्हा एकाधिकारशाही निर्माण होते. एकाधिकारशाही ही प्रजासत्ताक लोकशाहीस घातक असते. मीडिया हा संवादी असला पाहिजे. समाजाला सुदृढ करणारी पत्रकारिता केली पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. ढगे यांनी व्यक्त केली.
शेवटी समारोपीय भाषण करतांना डॉ. शैलजा वाडीकर म्हणाल्या की, पालकांनी आपल्या मुलांचे सुप्त गुण ओळखून त्याला प्रोत्साहित केले पाहिजे. कारण प्रत्येकात एक राजहंस दडलेला असतो, तो आपण शोधला पाहिजे, असं डॉ. वाडीकर म्हणाल्या. याप्रसंगी नागेश जोंधळे आणि हनुमंत वाघमारे या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच माध्यमशास्त्र संकुलातील पीएच.डी. संशोधक सतीश वागरे यांनी नेट परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुहास पाठक यांनी तर डॉ. सचिन नरंगले यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी प्रा. डॉ. दिपक शिंदे, प्रा. प्रज्ञाकिरण जमदाडे, प्रा. गिरीश जोंधळे, संशोधक साहेब गजभारे, प्रीतम लोणेकर, सचिन खंडागळे, भारती तांबे, आरती कोकुलवार, निकिता वाठोरे, हर्षवर्धन दवणे, मनोहर सोनकांबळे, रमेश मस्के, प्रा. रविंद्र सोनकांबळे, आश्विनी केवटे, डॉ. भास्कर भोसले, सय्यद गफार, विजय हंबर्डे, आसाराम काटकर सह पालक आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.