नांदेड| दिवसेंदिवस शिक्षणामध्ये आमुलाग्रह बदल घडत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए.आय.) मुळे शिक्षणक्षेत्रात मोठा बदल घडत आहे. जगभरात जे अभ्यासक्रम सुरू आहेत, तेच अभ्यासक्रम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांमध्ये देण्यात यावेत. आणि ते देण्यासाठी विद्यापीठाने जागतिक पातळीवरील स्पर्धेसाठी स्वतःला अद्यावत ठेवावे, असे मत महाराष्ट्र राज्याची माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार मा. अशोकराव चव्हाण साहेब यांनी व्यक्त केले.

ते आज दि.१४ जुलै (सोमवार) रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रातर्फे “मराठवाड्यातील सामाजिक आर्थिक विकास: समस्या व उपाय योजना” या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी विचारपीठावर त्यांच्या समवेत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे कुलगुरू प्रा. प्रशांत बोकारे, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, नरेंद्रदादा चव्हाण, डॉ. संगीता माकोने, डॉ. सुर्यकांत जोगदंड, डॉ. संतराम मुंढे, नारायण चौधरी, हनमंत कंधारकर, वित्त व लेखाधिकारी डॉ. पराग भालचंद्र यांची उपस्थिती होती. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नरेंद्रदादा चव्हाण यांच्या पुढाकारातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

पुढे चव्हाण साहेब म्हणाले की, मराठवाडयामध्ये अनेक सामाजिक समस्या आहेत. त्यावर उपाययोजना तयार करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभरात मान्यवरांनी या कार्यक्रमातून मराठवाड्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी उपाययोजना सुचवाव्यात. त्या आम्ही शासन दरबारी मांडून आपल्या भागाच्या विकासासाठी नेहमीप्रमाणे प्रयत्न करू. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रातील बहुतांश धरणे बांधण्यात आली. त्यामुळे शेतीसाठी पाण्याचा बऱ्याच समस्यावर मात केली आहे. विमानतळामुळे आपल्या भागाची मोठ्या शहराशी कनेक्टिव्हिटी वाढली आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात औद्योगिक विकास घडवता येणे शक्य झाले आहे.

विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये. कॉफी प्रकार हा उपटून टाकला पाहिजे. त्याशिवाय क्वॉलिटी विद्यार्थी घडणार नाहीत. जेकी आपल्या देशाचे उज्वल भविष्य आहेत. विद्यापीठाने गरजेप्रमाणे अभ्यासक्रमात बदल करावा जेणेकरून मार्केट रिक्वायरमेंट आणि सप्लाय, क्वॉलिटी प्रोडक्टमध्ये मिसमॅच होणार नाही. यासर्व बाबींचा रोड मॅप करून त्याचा पाठपुरावा करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. तरच मराठवाड्याचा आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळेल. शेवटी त्यांनी नवीन पिढीचे उज्वल भविष्य घडविणे ही विद्यापीठाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आपले विद्यापीठ व्यवस्थितरित्या पेलेत आहे, असे समाधानही यावेळी त्यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रामध्ये पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या प्रा. डॉ. नरेश बोडखे आणि दुसऱ्या सत्रामध्ये सायो इम्पिरिकल रिसर्च एलएलपी, पुणेचे समन्वयक प्रमोद सडोलीकर यांचे “मराठवाड्यातील सामाजिक आर्थिक विकास: समस्या व उपाय योजना” या विषयावर व्याखान पार पडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाच्या डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राच्या समन्वयक डॉ. योगिनी सातारकर यांनी केले तर आभार विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. डी. पवार यांनी मानले. यावेळी अधिसभा, विद्यापरिषद यासह विविध प्राधिकरणावरील सदस्य, प्राध्यापक अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी डॉ. अशोक टिपरसे, डॉ. प्रमोद लोणारकर, डॉ. शालिनी कदम, डॉ. प्रमोद बोधगीरे, डॉ. अजय मुठ्ठे, डॉ. नीलकंठ पाटील यांच्यासह अध्यासन केंद्रातील सदस्यांनी परिश्रम घेतले.
