उस्माननगर, माणिक भिसे। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे गोळेगाव (तपोवन) येथील अल्पभूधारक शेतक-यांच्या दोन गाभन म्हशी शनिवारी (दि.११) रोजी विषबाधेने दगावल्याची घटना घडली आहे. दरम्यान पशुधनविकास अधिकारी उत्तम गुट्टे यांनी उत्तरीय तपासणी केली असून त्यात विषबाधेने दगावल्याचे म्हटले आहे. आधिच दुष्काळसदृष्य परिस्थितीने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातच दोन गाभन म्हशी दगावल्याने पशूपालक शेतकऱ्यांचे अंदाजे दिड लाखाचे मोठं नुकसान झाले आहे.
गोळेगाव तपोवन येथील अल्पभूधारक शेतकरी व पशूपालक शिवाजी शेषराव शिराळे हे दुग्ध व्यवसाय करतात . जोड व्यवसाय व घरात गायी ढोर असण्याची पध्दत आहे. शनिवारी ( दि.११) रोजी दररोजच्या प्रमाणे आपल्या जनावरांना झाडाखाली बांधून चारा पाणी करून कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. त्यातील दोन म्हशींना सांयकाळी शिराळे यानी पाणी पाजल्यानंतर त्या दोन म्हशी जागावरच कोसळल्या अन् काही वेळातच गतप्राण झाल्या.
रविवार ( दि.१२) रोजी सकाळी पशुधनविकास अधिकारी डा. उत्तम गुट्टे यांनी शवविच्छेदन केले .त्यात विषबाधेने दगावल्याचे म्हटले आहे. दरम्यान सज्जाचे तलाठी मोतीराम पवार यांना ही भेट दिली. आधिच दुष्काळ सदृष्य परिस्थितीने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातच पशुपालकांच्या दोन गाभण म्हशी दगावल्याने शेतक-यांचे अंदाजे दिड लाखाचे नुकसान झाल्याने दुग्ध व्यवसाय अडचणी आला आहे.