श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। भारत देश स्वतंत्र होऊन ७० वर्ष उलटूनही माहूर तालुक्यातील अनेक गाव खेडे वाडी तांडे पाड्यात जाणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था जैसे थेच असून माहूर घाटाला लागून केरोळी शेकापूर गट ग्रामपंचायत मध्ये असलेल्या सातघरी गावाला जाणारा २ कि.मी रस्ता खासदार आमदारांनी आश्वासन देऊनही बनविण्यात आला नसल्याने येथील रहिवासी हाल अपेष्टा सहन करीत आहेत, त्यामुळे सदरील रस्ता तात्काळ बनवावा अशी मागणी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा केरोळी शेकापूर सातघरी गट ग्रामपंचायतचे माजी. सरपंच सुनील बेहेरे पाटील यांनी केली आहे.
माहूर तालुक्यातील अनेक ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत कोट्यावधी रुपयाचे रस्ते बनविण्यात आले परंतु सात घरी गावात गतवर्षी अतिवृष्टी मुळे एका नागरिकाचा मृत्यू झाला होता, त्यासाठी सदरील रस्त्यावरून माजी. खासदार हेमंत पाटील तसेच आमदार भीमराव केराम, माजी आमदार प्रदीप नाईक यांच्यासह अनेक अधिकारी पदाधिकाऱ्यांनी गावात जाऊन मयताच्या घरी भेट देत सांत्वन केले होते. तसेच दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्ता तत्काळ बनविण्याची सूचना केली होती, परंतु अधिकाऱ्यांनी खासदार, आमदारांच्या सूचना तसेच सातघरी गावातील नागरिकांनी विनंत्या करूनही रस्ता बनविला नसल्याने संबंधित विभागांनी खासदार,आमदारांच्या सूचना तसेच ग्रामस्थांच्या विनंत्या धुडकावून लावलेल्या दिसत आहेत.
सातघरी गाव घाटाला लागूनच वसलेले असल्याने घाटातील सर्व पाणी या गावातूनच जाते तसेच सात घरी गावाचा रस्ता लांजी बायपास रस्त्यावर निघत असून सात घरी पासून बायपास रस्त्याचे अंतर २ कि.मी आहे. या गावाला हा एकच मुळ रस्ता असून तिन्ही बाजूने घाटाची अवघड चढाई आहे. गाव छोटे असल्याने या गावात कुठल्या सुविधा नाही. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरूनच येणे जाणे करावे लागते, सदरील रस्त्यावर साधा मुरूमही टाकण्यात आला नसून दोन नालेपार करून बायपास रस्त्यावर यावे लागते.
घाटातील पाण्यामुळे नाल्याला पाणी राहत असल्याने, येणे जाणे कठीण होत असल्याने तालुक्या ठिकाणी असलेल्या आरोग्य सुविधा मिळविण्यापासून येथील ग्रामस्थांना वंचित राहावे लागत आहे.अशात गतवर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीत एका नागरिकांचा मृत्यूही झाला होता.झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून समता परिषद जिल्हा अध्यक्ष तथा माजी सरपंच सुनील बेहेरे पाटीलयांचे सह गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना संबंधित विभागांना निर्देश देऊन तात्काळ रस्ता बनवावा या अशयाचे निवेदन देवून मागणी केली आहे.