विद्यार्थ्यांनी मातीतून साकारला कामगार त्यांच्या जीवनात रांगोळीने आणला बहार
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व दयानंद कला महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ’ज्ञानतीर्थ’ युवक महोत्सव २०२३, राजा रविवर्मा कलामंच ५ वर मृदमूर्तिकला या प्रकारात एकूण २४ रांगोळी स्पर्धेत ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपली कला सादर केली . विद्यार्थ्यांनी साकारलेला कामगार हा विविध प्रकारचा होता. त्यामध्ये शेतीमध्ये काम करणारा शेतकरी, मूर्ती घडवणारा कुंभार, लाकडाचे काम करणारा सुतार, घर बांधकाम करणारा गवंडी, रोजी रोटी मिळवण्यासाठी रोज कामावर जाणारा मजूर, अशा विविध प्रकारचा कामगार विद्यार्थ्यांनी आपल्या मृदमूर्तिकलेतून साकारला.
व्यक्तीच्या जीवनात अर्थ आणि काम दोन्ही महत्त्वाचे आहे. काम केल्याशिवाय पैसा मिळत नाही आणि जीवन जगण्यासाठी पैशाची गरज लागते. आपलं जीवन उज्वल करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती कर्मनिष्ठ असतो. कामाशिवाय व्यक्तीचे जीवन अपूर्ण आहे. हेच विद्यार्थ्यांनी आपल्या मूर्ती कलेतून दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मग तो कामगार मजुर असो किंवा उच्च पदावर काम करणारा अधिकारी असो. प्रत्येकाला कामे करावीच लागतात .हा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या मृदमूर्तिकलेतून दिला.
‘अवघा रंग एकचि झाला’ विद्यार्थ्यांनी साकारल्या पारंपारिक सण उत्सवाच्या रांगोळी. व्यक्तीच्या, कामगाराच्या जीवनात रंग भरण्याचे काम हा निसर्ग करत असतो; पण प्रत्यक्ष जीवनात मात्र रंग आणण्याचे काम आपले हे पारंपरिक सण उत्सव करत असतात आणि सण उत्सवाला आपल्या घराच्या प्रांगणात साकार होते ते रांगोळी. सर्व रांगोळी कलाकार -विद्यार्थ्यांनी आपल्या विविध रंगातून वेगवेगळ्या धर्मातील सण- उत्सवाच्या रांगोळी काढून सर्वधर्मसमभावतेचा सामाजिक संदेश दिला. लोकांमध्ये सामाजिक जनजागृती होणे फार महत्त्वाचे आहे. असा संदेश देणारी रांगोळी विद्यार्थ्यांनी राजा रविवर्मा कलामंच ५यावर आपल्या कलेचे प्रदर्शन मृदमूर्तिकला व रांगोळी या ललितकलांच्या माध्यमातून साकारले.