बुधवारी मनमानी करणाऱ्या पेस्टीसाईड कंपन्या विरुद्ध मोर्चा इतरही प्रलंबीत मागण्याचा समावेश

नांदेड। मायबाप शेतकऱ्यांची कायम फसवणूक करणाऱ्या कीटक नाशके निर्मिती करणाऱ्या कंपण्या आता थेट व्यापाऱ्यांना देखील बेकायदेशीररित्या लक्ष करीत असून कृषी अधिकाऱ्यांचे काम स्वतः आपले प्रतिनिधी नेमून छापेमारी करीत आहेत.
मल्टिनेशनल कंपण्याची मनमानी थांबवावी आणि इतर स्थानिक प्रलंबीत मागण्यासाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) कामगार संघटना व्यापारी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व स्थानिक मागण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.२६ जून बुधवारी मोर्चा काढून जिल्हाधिकारी आणि महामहीम राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना निवेदन देणार आहे.
गोदरेज,एफएमसी,अदामा सारख्या कंपण्या आपल्या खाजगी प्रतिनिधी मार्फत कीटक नाशक दुकाने तपासणी करीत आहेत.
खरे तर हे काम कृषी अधीक्षक किंवा त्या विभागाच्या अधिकाऱ्यांचे आहे. परंतु असे बेकायदेशीर कृत्य नांदेड येथील नवा मोंढा ठिकाणी घडले असून व्यापाऱ्यांचा अवमान करण्यात आला आहे.
कंपण्यांनी नेमेलेले वितरक हे परवाना नसतांना बाहेर जिल्ह्यात कीटक नाशके आणि औषधी सरास विक्री करीत असताना मागील ४० ते ५० वर्षात असे कधीच झाले नाही हे आता होत आहे. या बेकायदेशीर कृत्या विरोधात नांदेड मध्ये बुधवारी दुपारी १२ वाजता भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे लेखी पत्र सीटू कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक, उप विभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर आणि जिल्हा कृषी अधिकारी नांदेड यांना दि.१८ आणि २१ जून रोजी दिले आहे.
मोर्चा नवीन मोंढा येथील कृषि अधीक्षक यांना निवेदन देऊन आयटीआय – कला मंदिर- एसपी ऑफिस – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. या मोर्चात नांदेड शहरातील मागील वर्षीचे थकीत अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ देण्यात यावे. मौजे वझरा येथील गावठाण विस्तार वाढ योजनेचा अहवाल माहूर तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांनी पाठवावा, संघटनेने व ग्रामसभेने सूचित केलेली जमीन अधिग्रहण करावी.
संजय गांधी योजनेतील तलाठी शेळके यांची बदली करावी. शहरातील नमस्कार चौक येथे सुलभ सोचालय तातडीने बांधण्यात यावे. बजरंग कॉलनी येथे बोअरवेल निर्माण करावेत. अतिवृष्टीत मरण पावलेल्या रामदास लोखंडे यांच्या कुटुंबाचे नांदेड शहरात पुनर्वसन करावे व त्यांच्या मुलास मनपा मध्ये नोकरी द्यावी. आणि २५ लाख रुपयांची आर्थिक मदत करावी.
मारोती केंद्रे यांच्या मुलाच्या मृत्यूची चौकशी करावी व त्यांच्या कुटुंबाचे शहरात पुनर्वसन करावे आदी मागण्या सह इतरही मागण्या करण्यात येणार आहेत. या मोर्चात मोंढा येथील कामगार, व्यापारी हमाल आणि शेतकरी, पूरग्रस्त मोठ्या संख्येने सामील होणार आहेत आणि मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन सीटू कामगार संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
नवा मोंढा येथील सुप्रसिद्ध कीटक नाशके व्यापारी श्री सचिन कासलीवाल यांच्या वेंकटेश्वरा ऍग्रो दुकानावर गोदरेज कंपनीच्या खाजगी महिला तपासणी अधिकाऱ्यांनी पोलीस सोबत घेऊन बेकायदेशीर रित्या धाड टाकून कायद्याचे उल्लंघन केले असून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सीटू सह विविध पक्ष संघटना करीत असून महामहीम राष्ट्र्पती आणि पंतप्रधान भारत सरकार यांना जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन देणार आहेत.
या मोर्चाचे नेतृत्व कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.उज्वला पडलवार, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड,कॉ. श्याम सरोदे, कॉ. जयराज गायकवाड,कॉ. मारोती केंद्रे, कॉ. सोनाजी कांबळे,कॉ.मंगेश वट्टेवाड, कॉ.बंटी वाघमारे,कॉ.अशोक बोकेफोड सह सर्व तालुका कमिटीचे पदाधिकारी करणार आहे.
