नायगाव, रामप्रसाद चन्नावार। इमारतीमधील घाण व कचरा साफ करण्याच्या कारणावरून भाडेकरूने घरमालकास पहिल्या मजल्यावरून ढकलून दिल्याने घरमालकाचा मृत्यू झाला असून या प्रकरणातील आरोपीची पोलिस कोठडीतील मुदत संपल्याने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
नायगाव शहरातील वसंतनगर मधील मटन मार्केट समोर दगडू आप्पा मलमवार यांची तीन मजली इमारत असून या इमारतीमध्ये अनेक जण भाड्याने राहतात. याच इमारतीमध्ये खालच्या शटरमध्ये राम बालाजी भैरवाड (रा. बोरगडी, ता. हिमायतनगर) यांनी धनलक्ष्मी लॅमिनेशन डोअर ऑफ फर्निचर वर्क्स या नावाने दुकान चालवतात. वरच्या मजल्यावर दोन रूम भाड्याने घेऊन राहतात.
साफसफाई करून स्वच्छ ठेवण्याच्या कारणावरून भैरवाड व मलमवार यांच्यात वादावादी होत असे. त्यामुळे भैरवाड यांना शटर व रूम रिकामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याने त्याचा राग भैरवाड यांच्या मनात होता. त्यातच भैरवाड याचा रागाचा पारा चढल्याने त्याने मलमवार यांच्याशी वाद घातला. त्यानंतर थेट त्यांना मजल्यावरुन खाली ढकलून दिले.
घरमालकाचा झाला होता मृत्यू
१७ नोव्हेंबर रोजी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यात भाडेकरूने घरमालकास वरच्या मजल्यावरून खाली ढकलून दिल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात राम भैरवाड याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यास अटक केली व तो पोलिस कोठडीत होता. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर केले असता त्याची आता तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.