नांदेड| हदगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोडगी येथील विद्यार्थी प्रिय शिक्षिका प्रमिला रायबोले-ढवळे यांना गुरुवर्य एम.पी. भवरे स्मृती राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शांताबाई जवळगावकर व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
स्मृतीशेष गुरुवर्य एम.पी. भवरे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड, बहुजन युवा फोर्स महाराष्ट्र राज्य, पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात येते. साप्ताहिक वृत्त वारसदारचे संपादक त्रिरत्नकुमार भवरे व लक्ष्मणराव भवरे हे या कार्यक्रमाचे आयोजन करतात. हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथे या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमिला रायबोले यांनी त्यांच्या 28 वर्षाच्या दीर्घ सेवेत शिक्षणासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. माता संवादातून सर्व मुली त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करतील यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. विद्यार्थ्यांसाठी सदैव तत्पर असलेल्या रायबोले यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल गटशिक्षणाधिकारी किशन फोले, जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, शाळेचे मुख्याध्यापक राजाराम राठोड, सहकारी शिक्षक, राजेश मोकले, अशोक पवार, शिक्षिका सुमन शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.