नांदेडलाईफस्टाईल

यळकोट यळकोट जय मल्‍हार घोषाने माळेगाव यात्रेला सुरुवात; कृषी प्रदर्शन, विविध स्टॉलचे उद्घाटन

श्रीक्षेत्र माळेगाव| उत्‍तम जागा पाहूनी मल्‍हारी देव नांदे गड जेरुरी अशा जयघोषात येळकोट येळकोट जय मल्‍हार म्‍हणत, बेलभंडा-याची उधळण करीत पारंपारीक पध्‍दतीने यंदाही माळेगावच्‍या श्रीखंडोबा रायाच्‍या यात्रेस शुभारंभ झाला आहे. यावेळी लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. खंडोबाच्‍या व मानक-यांच्‍या पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने मानाचा फेटा, शाँल श्रीफळ व मानधन देवून स्‍वागत करण्‍यात आले.

प्रारंभी सकाळी शासकीय पुजा करण्‍यात आली. त्‍यानंतर दुपारी पालखी पुजनानंतर देव स्‍वारी काढण्‍यात आली. यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, माळेगावच्या सरपंच कमलबाई रुस्तुमराव धुळगंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ संतोष तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा माळेगाव यात्रा सचिव मंजूषा कापसे, नारायण मिसाळ, रेखा काळम-कदम, अमित राठोड, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊवार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रणिताताई देवरे- चिखलीकर, चंद्रसेन पाटील, पुरुषोत्तम धोंडगे, व्ही.आर. बेतीवार, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बोधनकर, रोहित शिंदे, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार लाड, गट विकास अधिकारी अडेराघो आदींची उपस्थिती होती

मानक-यांचा गौरव – पालखीचे मानकरी गणपतराव मल्‍हारी नाईक (रिसनगाव), गोविंदराव नागेशराव महाराज (कुरुळा), व्‍यंकटराव मारोतीराव पांडागळे (शिराढोण), खुशाल भगवानराव भोसीकर (पानभोसी), गोविंदराव बाबाराव नाईकवाडे (पानभोसी), पांडुरंग नारायणराव पाटील (माळेगाव), मल्‍हारी रावसाहेब पाटील (माळेगाव), विजयकुमार शंकरराव कनकंदडे (आष्टुर) या मानक-यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने फेटा बांधून गौरव करण्‍यात आला. खंडोबा यात्रेत वाघ्‍या-मुरळी – उत्‍तम जागा पाहूनी मल्‍हारी देव नांदे गड जेजूरी उत्‍तराची जेजूरी गडाला नऊ लाख पायरी असा घोष करत वाघ्‍या मुरळी खंडोबाची सेवा करते. पारंपारीक पध्‍दतीने कवडयाच्‍या माळी, लांब हळदीचा मळभट, हातापायावर चाबकाचे फटके मारत वाघ्‍या मुरळी खंडोबाची सेवा करत असते. या वाघ्‍या मुरळीला पाहण्‍यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

श्रीक्षेत्र माळेगाव यात्राकाळात शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी मिळाल्या तर अधिकचे उत्पन्न शेतकरी घेऊ शकतील. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी आमचे पर्यंत आहेत. शेतकरी जगला तर देश पुढे जाईल, असे प्रतिपादन आमदार शामसुंदर शिंदे यांनी केले. नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने आज माळेगाव यात्रेत सन 2023-24 मध्ये डॉ. शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ पुरस्कारासाठी निवड झालेल्या 19 शेतकऱ्यांचा शाँल, स्मृतिचिन्ह, मानपत्र, प्रमाणपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा कृषी अधिकारी व्ही. आर. बेतीवार, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, प्रशांत दिग्रसकर, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, डॉ. गिरी, रोहित शिंदे, चंद्रशेन पाटील, पुंडलिक बोरगावकर, सचिन कल्याणकर, सचिन कराळे, सुधाकर शिंदे, गोविंदराव हापगुंड्डे, गट विकास अधिकारी आडेराघो, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे आदींची उपस्थिती होती.

पुढे ते म्हणाले, शेती क्षेत्रामध्ये महिलांचा सिंहाचा वाटा आहे. महत्त्वाच्या निर्णयात महिलांचा विचार घ्यावा. महिलांच्या हाती पैसा दिला तर पैसे साठवून कुटुंबाला महिलाच पुढे नेईल शिकतील. शेती विकासासाठी सिंचनाच्या सुविधा होणे गरजेचे आहे. यावर्षी विम्याचा निधी मंजूर झाला असून ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या प्रत्येक तालुक्यातील एक याप्रमाणे 16 शेतकऱ्यांचा व उत्तेजनार्थ तीन असे एकूण 19 शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कृषी अधिकारी व्ही. आर. बेतीवार यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषी प्रदर्शन, विविध स्टॉलचे उद्घाटन

जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्यावतीने श्रीक्षेत्र माळेगाव येथे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची दालने थाटण्यात आली आहे. यात्रेतील कृषी प्रदर्शनाचेही उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात विविध दालने आहेत. ज्यामध्ये वैशिष्ट्यपुर्ण वाणाचे विविध फळ, भाजीपाला आणि पिकांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहेत. तसेच कृषी अवजारांची, खते व विविध कृषोपयोगी उपकरणे-घटकांची दालने आहेत. याशिवाय शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, समाज कल्याण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषि व पशुसंवर्धन आरोग्य विभाग, जिवन्नोनती अभिमान यांच्यासह विविध विभागाचे दालने आहेत. त्यांचेही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध जनावरे घेऊन पशुमालक दाखल झाले आहेत. उच्च प्रतीची जनावरे मिळण्याचे दक्षिण भारतातील महत्वाचे ठिकाण म्हणून यात्रेचा लौकिक आहे. याठिकाणी व्यापाऱ्यांची अनेक वस्तु विक्रीची दुकाने थाटली. शेती आणि घरातील उपयोगाच्या लहान-मोठ्या वस्तु या यात्रेत नागरिक खरेदी करीत असल्याने यावर्षीही व्यापारपेठ मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या लहान मुलांपासून थोरा-मोठ्या पर्यंतच्या सर्व प्रकारच्या मनोरंजनाच्या गोष्टींनी ही यात्रा सजली आहे. लोककलाच्या सादरीकरणासाठी कलावंतांच्या संचांनी ठिकठिकाणी तंबू थाटले आहेत. मनोरंजनाच्या खेळांचे अनेकविध प्रकारही दाखल झाले आहेत. जिल्हा परिषदेने दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांसाठी कृषिविषयक स्पर्धा, पशुपालकासाठी स्पर्धा, पशु प्रदर्शन यांचे आयोजन केले आहे. जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाच्या वतीने सन 2023-24 वर्षातील डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराने 19 शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय लोककला, आणि लावणी महोत्सवही यात्रेचे मोठे आकर्षण आहे. यात्रेसाठी आरोग्यविषयक सुविधा आणि पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे.

माळेगाव यात्रेत भाविकांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने ठिकठिकाणी शौचालयाची सुविधा
जिल्हा परिषदेच्या वतीने माळेगाव यात्रेत यावर्षी विविध सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. माळेगाव यात्रेत ठिकठिकाणी यावर्षी यात्रेत नवीन पाच शौचालयाचे युनिट उभारण्यात आले आहे. एमएसईबी स्टॉलच्या परिसरात एक युनिट, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी शौचालयाची युनिट, महादेव मंदिर परिसर, जिल्हा परिषद भांडार गृहाच्या समोर, चादर-बेडशिट लाईन व पाण्याच्या टाकीजवळ एक असे नवीन शौचालयाची सुविधा आहे. तसेच यापूर्वीचे शौचालयाची दुरुस्ती करुन सदर शौचालय सुरु केले आहेत. बनवस बायपास, पोलीस चौकीच्या मागे व पोलीस चौकीच्या समोर तसेच बीएसएनएलच्या स्टॉलच्या जवळ शौचालय सुविधा देण्यात आली आहे.

फिरत्याते शौचालय – याशिवाय फिरत्या शौचालयाची सुविधाही यात्रेत ठेवण्यात आले आहेत. दहा-दहा युनिटचे चार फिरते शौचालय माळेगाव यात्रेमध्ये आहेत. लावणी महोत्सव परिसर, बस स्थानक परिसर, कृषी स्टॉल आदी परिसरात फिरते शौचालय ठेवण्यात आले आहेत. ग्रामीण पाणी पुरवठाच्या वतीने सदर शौचालयास टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या पुढाकारातून यावर्षी माळेगाव यात्रेत मोठ्या प्रमाणात शौचालयाच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा माळेगाव यात्रा सचिव मंजुषा कापसे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी पुढाकार घेऊन माळेगाव यात्रेत सुविधा दिल्या आहेत. यावर्षी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात शौचालयाची सुविधा दिल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

प्लास्टिकमुक्त यात्रेचा संकल्प – नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच प्लास्टिकमुक्त यात्रेचा संकल्प केला आहे. माळेगाव यात्रेत ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी लोहा ग्रामपंचायत संघटनेनेही पुढाकार घेतला आहे. यात्रा परिसरामध्ये कृषी स्टॉल, बचत गट, सटवाई मंदिर, जिल्हा परिषद भांडारगृह, मंदिर परिसर, सार्वजनिक बांधकाम विश्रामगृह, पोलीस चौकी, जिल्हा परिषद शाळा, अहमदपूर बसस्थानक ,लातूर बसस्थानक व नांदेड बसस्थानक आदी परिसरामध्ये कचराकुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. दरम्यान लोहा ग्रामपंचायत संघटनेनेही प्लास्टिकमुक्ती संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या संकल्पनेला सहमती दर्शवत प्रत्यक्ष माळेगाव यात्रेत प्लास्टिक संकलन करणार आहेत.

संघटनेचे अध्यक्ष गजानन शिंदे व सचिव शैलेश बिस्मिल्ले यांनी ही माहिती दिली. या सोबतच कृषी तांत्रिक संघटनाचे अरुण चौधरी, सय्यद इब्राहिम, ग्रामसेवक संघाचे मधुकर मोरे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या निर्णयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल तसेच ग्रामपंचायत माळेगाव यात्रा यांनी स्वागत करुन अभिनंदन केले आहे. तसेच जीवनोन्नती अभियानांतर्गत बचत गटांच्या स्टॉलमध्येही कापडी पिशव्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. एक, दोन व पाच रुपये असे दर ठेवण्यात आले आहेत. तरी भाविकांनी कापडी पिशव्या घ्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!