मुलांच्या जेवणाचा विचार करते ती आई असते तर त्यांच्या जीवनाचा विचार करतो तो बाप असतो- डॉ.अभिजीत सोनवणे

भोकर। जी मुलांच्या जेवणाचा विचार करते तिला आई म्हणतात तर जो त्यांच्या संबंध जीवनाचा विचार करतो त्याला बाप म्हणतात असे हृदयस्पर्शी विचार सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणून सुप्रसिद्ध असणारे डॉ. अभिजीत सोनवणे यांनी बोलताना व्यक्त केले. ते दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी सेवा समर्पण परिवाराच्या ५ व्या वर्धापन दिनाच्या औचित्यांने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याला उत्तर देताना डॉ.अभिजीत सोनवणे बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील जेष्ठ रंगकर्मी तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा.दत्ता भगत सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अव्वर सचिव उपमुख्यमंत्री कार्यालय मुंबई मा.राजेंद्र खंदारे,उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार सुरेश घोळवे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सेवा समर्पण परिवारांनी केलेल्या अनेक गावातील विविध विधायक कार्याच्या छायाचित्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की मी भिकाऱ्यासोबत बसतो म्हणून मला भिकाऱ्याचा डॉक्टर असे संबोधतात परंतु मला याचा सार्थ अभिमान आहे.कारण माझे जीवन एका भिकाऱ्यांच्या योगदानातून घडले आहे हे मी मरेपर्यंत विसरणार नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या उत्कर्षासाठीच काम करीत राहील असे सांगितले.विद्यार्थी किती टक्के गुण घेतला यावर त्याचा मोठेपणा अवलंबून नाही तर त्याच्या अंगात किती गुण आहेत यावर त्याचा मोठेपणा अवलंबून असतो. म्हणून सदैव चांगल्या गुणाची कास धरा ज्यांना आई- वडिलांचा आधार आहे त्यांना भाग्यवान म्हणतात.
मला तर २०० माता व २०० पिता यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर असल्याने मी सगळ्यात मोठा भाग्यवान आहे असे सांगून भिकाऱ्यांना भीक देऊन त्यांना आळशी बनवू नका तर ते स्वतःच्या पायावर कसे उभे राहतील यासाठी सहकार्य करा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना करून सेवा समर्पण परिवारांचे कार्य खूप स्तुत्य असून त्यांनी दिलेल्या पुरस्कारातून मला सेवा करण्यासाठी मोठे बळ मिळेल असा आशावाद बोलताना व्यक्त केला.
या कार्यक्रमात दुसरे पुरस्कार प्राप्त दैनिक सकाळचे संपादक तथा व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीप काळे यांनी आपले विचार व्यक्त करताना पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून तो जीवनात इमानदार असला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत राहू शकेल.जे सत्य आहे तेच लोकांसमोर न डगमगता निर्भयपणे आपल्या लेखणीतून मांडले पाहिजे.चंद्र,सूर्य असेपर्यंत पत्रकारांचे महत्त्व या जगात कमी होणार नाही असे सांगून पत्रकारांनी आपले संघटन मजबूत बनवण्याचे आवाहन उपस्थित पत्रकारांना केले.
डॉ.अभिजीत सोनवणे व संपादक संदीप काळे यांना समाजसेवा सेवा समर्पण राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येऊन त्यात शाल,श्रीफळ,मानपत्र, सन्मान चिन्ह व ११ हजार रुपये रोख देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिवाराचे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड यांनी केले.सूत्रसंचालन प्राध्यापिका मीरा जोशी यांनी केले तर आभार प्रा.उत्तम जाधव यांनी मानले.
या कार्यक्रमास शहरातील डॉक्टर मंडळी, प्राध्यापक मंडळी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर,सरपंच,उपसरपंच मंडळी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवा समर्पण परिवाराचे सचिव विठ्ठल फुलारी यांच्या सह सर्वानी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय मतदार दिन शपथ सर्वांना देण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
