नांदेड| नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील सीमावर्ती करखेली गावात जलजीवन मिशनअंतर्गत उत्कृष्ट नळ पाणीपुरवठा योजना यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेमुळे सुमारे ८ हजार लोकसंख्येला दररोज शुद्ध व नियमित पाणीपुरवठा सुरू झाला असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

धर्माबाद शहरापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असलेल्या करखेली गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ४ हजार ६७५ होती, मात्र आज ती सुमारे ८ हजारांवर पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे २ कोटी २७ लाख रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली.

या योजनेअंतर्गत एक विहीर खोदण्यात आली असून त्यात २० एचपी क्षमतेचा सबमर्सिबल पंप बसवण्यात आला आहे. या विहिरीपासून गावातील मुख्य पाण्याच्या टाकीपर्यंत १८० मिमी व्यासाच्या सहा केजी क्षमतेच्या एचडीपीई पाईपद्वारे दोन किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात आली आहे.

तसेच गावासाठी ३ लक्ष ८५ हजार लिटर क्षमतेची जलटाकी उभारण्यात आली आहे. या टाकीमधून गावात सुमारे ८ किलोमीटर लांबीची तीन इंची वितरण पाईपलाईन टाकून ५०८ घरांना नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. यामुळे हर घर नळ संकल्पनेनुसार प्रत्येक कुटुंबाला थेट नळाद्वारे स्वच्छ पाणी मिळू लागले आहे.
या योजनेमुळे गावातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा सुटल्याने ग्रामस्थांनी शासनाचे आभार मानले आहेत. ही योजना ग्रामविकासाचे उत्कृष्ट उदाहरण ठरत असून तिच्या प्रभावामुळे इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी ठरत आहे, असे मत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब यांनी व्यक्त केले.
