नायगाव, रामप्रसाद चन्नावार| जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय नायगाव बा. आणि स्नेहल कॉम्प्युटर नायगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज सायबर सुरक्षितता जाणीव या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा जनता कनिष्ठ महाविद्यालय नायगाव येथे संपन्न झाली. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के.जी. सूर्यवंशी, नायगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुट्टे साहेब, एम. के. सी. एल. चे सय्यद अखिल, उपप्राचार्य प्रा.प्रभाकर पवार, पर्यवेक्षक डॉ.गणेश देवडे, पर्यवेक्षिका प्रा.सौ.शोभा शिंदे, प्रसिद्धी प्रमुख प्रा.पि.डी.जाधव यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक गुट्टे म्हणाले की माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अभासी गुन्हेगारी अधिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे.त्यास शिकलेला वर्ग अधिक बळी पडत आहे. अशा प्रवृत्ती पासून आपण सावध असावे. तसेच आपल्या मोबाईलचा वापर करताना सावधगिरी बाळगावी. सोशल मीडियाचा वापर करताना कुठल्याही धार्मिक, जातीय तेढ होणार नाही याची कमेंट करताना दक्षता घ्यावी असे सर्वांना आवाहन केले. तसेच यावेळी प्रमुख मार्गदर्शक सय्यद अखिल यांनी उपस्थितांना सायबर क्राईम वर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोप करताना जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के.जी. सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना इंटरनेट हे दुधारी शस्त्र असून इंटरनेटचा वापर फक्त अभ्यासासाठी करावा आणि यशस्वी होण्यासाठी आपल्या ध्येयपूर्तीपर्यंत सोशल मीडिया पासून दूर राहावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल कॉम्पुटर नायगाव चे संचालक श्रीपत ढगे सर यांनी केले .सदरील कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.