हिमायतनगर,अनिल मादसवार। हिमायतनगर शहर व तालुका परिसरात सोमवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अचानक वातावरणात बदल होऊन झालेल्या वादळी पावसामुळे अनेकांचे एक धावपळ उडाली होती, तर शेतीत पूर्वमशागत कामे करणाऱ्या शेतकऱ्यांना वादळामुळे उडून गेलेल्या वैराण आणि इंधनाची सारवा सारव करतांना नाकेनऊ आले होते. दरम्यान पुन्हा रात्री9 वाजता जोरदार पाऊस झाला, आजच्या वादळी पावसाने उन्हामुळे होत असलेल्या उकाड्याने नागरिकांना दिलासा मिळाला असून, सर्वत्र वातावरण गारवा निर्माण झाला होता.
तर आंब्याच्या झाडाला लगडलेली आंबे, टरबूज, चिकूसह ईतर फळबागांचे व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच शेतात साठवून ठेवलेलं इंधन परहट्या व वैरण उडून गेली, तर शेतीत असलेल्या हळद, तीळ, भुईमूग, सूर्यफूल,उन्हाळी ज्वारी, आदी पिकांचे नुकसान तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या तर काही ठिकाणी झाडे जमीनदोस्त झाली. ग्रामीण भागातील काही गावातील नागरिकांच्या घरांसह झोपड्या वरील टिनपत्रे उडून गेल्याने संसारउपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले आहे. तर ग्रामीण भागातील वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे.
गेल्या 8 दिवसापासून वातावरणात उकाडा वाढला आहे, अंगाची लाही लाही होत असून, दोन दिवसांपासून वातावरण बदल होऊन कधी ढगाळ तर कधी कडकडीत ऊन यामुळे अचानक वादळी वारे येऊन दोन दिवसांपूर्वी हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथील शिवाजी डवरे यांच्याघरावरील टिनपत्रे उडून गेली, तर आज झालेल्या वादळी वारे, विजांचा कडकडाटात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना हैराण करून सोडले, मात्र पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी, व्यापारी व बाजारात आलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली असल्याचे पहावयास मिळाले आहे..