नांदेड। शहरालगत असलेल्या वाजेगांवची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. मागील पंधरा ते वीस वर्षांपासून अखंड कामावर कार्यरत असलेल्या शालेय पोषण आहार कामगारांना कामावरून काढण्यासाठी शाळा आणि शिक्षण समिती पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहे.पीडित बहुतांश कामगार हे दलित असून जातीय द्वेष्यातून हा प्रकार घडत असल्याची लेखी तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिली आहे.
त्याचे कारण काय तर उपरोक्त शाळेत खोटी विद्यार्थी पट संख्या दाखवून जास्त प्रमाणात रेशन,माल मटरेल उचलून तत्कालीन मुख्याध्यापक आणि शिक्षण समितीने अपहार केला अशी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नांदेड यांच्या कडे या कामगारांनी केली म्हणून.
वाजेगांव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणारे बहुतांश कामगार हे महिला आणि दलित प्रवर्गातील आहेत.
वीस वर्षात कधी त्यांच्यावर ग्रामपंचायत कोपली नव्हती परंतु मागील एक वर्षांपासून सरपंच, मुख्याध्यापक आणि शिक्षण समिती पिच्छा सोडायला तयार नाही. खरे तर सरपंच आणि शिक्षण समितीने शाळा सुधारण्याकडे आणि काही अनियमितता होत आहे काय याकडे लक्ष देणे गरजेचे असते. परंतु येथे उलट होत आहे भ्रष्टाचाराची तक्रार का केली म्हणून कामगारांना लक्ष करण्यात येत आहे.
दि.१७ जुलै रोजी वाजेगांव येथील शापोआ कामगारांनी जिल्हा परिषदे समोर अमरण उपोषण सुरु केले होते.तेव्हा शिक्षण विभागाने लेखी पत्र देऊन उपोषण सोडविले होते.त्या उपोषणात रेखाबाई श्यामराव गजभारे,कांताबाई सोमाजी तारू,सयाबाई प्रकाश राक्षसमारे,महरून बेगम शेख हरून, बेगमबी शेख गफार आदी महिला होत्या आणि दोन नोव्हेंबर पासून पुन्हा ह्याच महिला जिल्हाधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषणास बसणार आहेत.जिल्हा परिषद न्याय देण्यात उदासीन असल्यामुळे पुढील उपोषण जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयापुढे करण्यात येणार आहे.
उपोषणास बसणारे सर्व उपोषणार्थी हे सीटू संलग्न महाराष्ट्र शालेय आहार कामगार संघटनेचे सभासद आहेत.त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक कामगार जिल्हाधिकारी कार्यालय येथे तळ ठोकून थांबणार आहेत. जातीय द्वेष्यातून त्रास दिला जात असल्याचे निवेदनात नमूद असून दि.२७ ऑक्टोबर रोजी निवेदन जिल्हा प्रशासनास दिले आहे.अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस कॉ.गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.