नांदेड| महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असणा-या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या शिवचित्रपट निवड समितीमध्ये सदस्य म्हणून डॉ. पृथ्वीराज तौर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, कर्तृत्व आणि जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटांची निवड करून ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त शासनाच्या वतीने आयोजित विविध उपक्रमांमध्ये हे शिवचित्रपट दाखवण्यात येणार आहेत.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, ३५० वा शिवराज्याभिषेक व पद्मश्री शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यात प्रत्येक तालुकास्तरावर शिवचित्रपट दाखवले जाणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उत्तुंग जीवनाचे आणि अतुलनीय कार्य कर्तृत्वाचे चित्रण करणारे निवडक शिवचित्रपट निश्चित करण्यासाठी निवड समितीची स्थापना करण्यात येऊन या समितीमध्ये तज्ज्ञ सदस्य म्हणून डॉ. पृथ्वीराज तौर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. पृथ्वीराज तौर हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत असून ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक आहेत. एफटीआयआय या जगद्विख्यात चित्रपट प्रशिक्षण संस्थेचे विविध अभ्यासक्रम ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये आयोजित करुन चित्रपट साक्षरता वाढविण्यात डॉ. तौर यांचे योगदान आहे. डॉ. तौर यांनी एफटीआयआय मधून एफए कोर्स पूर्ण केलेला आहे.
डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या नियुक्तीबदल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, अधिष्ठाता डॉ. विकास सुकाळे, डॉ. एम. के. पाटील, डॉ. दिपक पानसकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, कार्यकारी अभियंता तानाजी हुसेकर, डॉ. दिपक बच्चेवार, डॉ. शैलजा वाडीकर, डॉ. दिपक शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.