माहूर| माहूर तालुका क्रीडा समितीच्या वतीने सह्याद्री पब्लिक स्कूल येथे आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दणदणीत कामगिरी करून विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. क्रिकेट, बॅडमिंटन व चेस अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये चेस व बॅडमिंटनमध्ये जीनियस किड्सच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावत थेट जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.

चेस स्पर्धेत क्षितिज मोरे, स्वरा जगताप, सोहम दांडेकर आणि वेदांत रिठे या चौघा विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट खेळ सादर करत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. त्यांच्या पराक्रमी खेळामुळे त्यांना तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला आणि जिल्हा स्तरावर स्पर्धा करण्याची सुवर्णसंधी मिळाली.

तर बॅडमिंटन स्पर्धेत कैफ सरफराज दोसानी, कन्हैया मुसळे आणि श्रीपाद जाधव या विद्यार्थ्यांनी जोशपूर्ण खेळ सादर करून आपली वेगळी छाप उमटवली. या तिन्ही खेळाडूंनी दमदार विजय मिळवून माहूर तालुक्याचा मान उंचावला.

या विजयी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन क्रीडा शिक्षक मुनेश्वर यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष भाग्यवानजी भवरे, मुख्याध्यापक संतोष कुमार, उपमुख्याध्यापक आयफाज शेख यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत जानबाजी केशवे विद्यालय माहूर, जगदंबा विद्यालय माहूर, शंकरराव चव्हाण विद्यालय आष्टा, सह्याद्री पब्लिक स्कूल माहूर, पंचशील विद्यालय लखमापूर आदी शाळांमधील विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.
माहूर तालुक्यातील जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करून क्रीडा क्षेत्रात मानाचा झेंडा रोवला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतही हे खेळाडू उत्तम कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
