नांदेड| भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा हा शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी आहे. त्यामुळे कष्टकरी ,शेतकरी आणि मजुरांच्या जीवनाच्या दुःख , वेदना यावर जास्तीत जास्त साहित्य समाज पटलावर आलं पाहिजे. जोपर्यंत कष्टकरी , शेतमजुरांचे कष्ट समाज आणि शासनाला दिसणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने सामाजिक समता निर्माण होणार नाही असे मत प्रसिद्ध कथाकार राजेंद्र गहाळ यांनी व्यक्त केले. बरबडा येथे आयोजित करण्यात आलेल्या जवाहरलाल नेहरू माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील सहाव्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
बरवाडा येथे स्वातंत्र्य सेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी बरबडेकर यांच्या स्मृतीपित्यार्थ राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन रविवारी पार पडले . या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कलाकार राजेंद्र गहाळ उपस्थित होते . भगवान अंजनीकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाची सुरुवात झाली.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले . यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, सदाशिवराव धर्माधिकारी, जेष्ठ साहित्यिक डॉक्टर जगदीश कदम, शिवाजीराव धर्माधिकारी, प्राध्यापक नारायण शिंदे, दिगंबर कदम , राम कठारे , अमृत तेलंग , राम तरटे, शंकर वाडेवाले, पंडित पाटील, प्र. श्री. जाधव , शिवदास पेठे, बबन आव्हाड, प्रा. व्यंकटी पावडे, प्रा. आत्माराम राजेगोरे , जगदीशराव धर्माधिकारी, विजय चित्तरवाड , बरबडा नगरीचे सरपंच माधवराव कोलगाने, आबासाहेब कल्याणकर , बालाजी पेठकर , मुख्याध्यापक वसंत शिंदे, प्राध्यापक सूर्यदर्शनराव धर्माधिकारी, शिवाजी जोगदंड , प्रल्हाद जेठेवाड आदींची उपस्थिती होती.
संमेलनाध्यक्ष कथाकार राजेंद्र गहाळ म्हणाले की, ग्रामीण व्यथा व तेथील वेदना संवेदनशीलपणे व अविरतपणे मांडणारे साहित्य सातत्याने समाज पटलावर आले पाहिजे . जोपर्यंत समाजाला कष्टकरी ,शेतकरी, शेतमजूर यांच्या जीवनाचे दुःख, वेदना, समस्या , संघर्ष इतरांना , येणाऱ्या पिढ्यांना समजणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने सामाजिक समता आणि लोकशाही निर्माण होणार नाही. साहित्यात जोपर्यंत शोषित, पीडित, वंचितांना न्याय हक्क देण्यासाठी लेखणी झिजणार नाही , तोपर्यंत खऱ्या अर्थाने साहित्य प्रगल्भ आणि परिपक्व होणार नाही असे सांगतानाच तर म्हणाले की, अलीकडच्या काळात वाचन संस्कृती कमी होत असल्याची चिंता ही त्यांनी व्यक्त केली .
सालगड्याचा मुलगा म्हणून जन्माला आलो असलो तरी स्वकर्तृत्वाने आणि आई-वडिलांच्या पुण्याइने मी शिक्षक होऊ शकलो. कथाकार होऊ शकलो .साहित्यिक होऊ शकलो आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी आज साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊ शकलो ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे . त्यामुळे गरिबी आणि कष्ट यांची कधीही लाज वाटली नाही पाहिजे . ग्रामीण भागाच्या मातीत जगातील सर्व यशाची रहस्य दडलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या व कष्टकऱ्यांच्या मुला मुलीने नकारात्मक दृष्टिकोन बाजूला ठेवून यश मिळविण्यासाठी निष्ठेने आणि धाडसाने पुढे जाण्याची गरज आहे. बदलत्या काळाची पावले ओळखून आयुष्याचे नियोजन केल्यास निश्चितपणे जगातील कोणतेही यश आपल्यापासून दूर जाणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला .
ज्येष्ठ साहित्यिक भगवान अंजनीकर यांचे उद्घाटकीय भाषण झाले तर माजी संमेलन अध्यक्ष प्रा. जगदीश कदम यांनी आपल्या भाषणातून उपस्थित रसिकांना खेळवून ठेवले. तत्पूर्वी संमेलनाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वसंत शिंदे यांनी केले. संमेलनाचे संयोजक दिलीपराव उर्फ माधवराव धर्माधिकारी यांनी संयोजना मागील भूमिका व्यक्त केली . माजी संमेलना अध्यक्ष नारायण शिंदे यांनी इंद्रजीत भालेराव यांच्यावतीने संमेलन अध्यक्ष पदाचे सूत्र गहाळ यांना प्रदान केले. दुसऱ्या सत्रात प्रसिध्द कथाकार दिगंबर कदम यांची प्राध्यापक व्यंकटी पावडे आणि प्राध्यापक आत्माराम राजेगोरे यांनी प्रकट मुलाखत घेतली तर तिसऱ्या सत्रात कथाकार राम तरटे यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथनाचा कार्यक्रम पार पडला . सायंकाळी पाच वाजता युवा कवी अमृत तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. हे कवी संमेलन या साहित्य संमेलनाचे खास वैशिष्ट्य ठरले . अमृत तेलंग यांनी आपल्या खास शैलीतील लेक ही कविता सादर करून उपस्थितांची केवळ मने जिंकली नाहीत तर अनेकांच्या पापण्याही ओल्या केल्या. त्यामुळे साहित्य संमेलनाची उंची अधिकच वाढली होती. साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक येथील शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.