नायगांव/नांदेड| संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर सर्व पक्षाचे कार्यकर्ते ,नेते निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये भाजपासोबत महायुतीमध्ये प्रमुख घटक पक्ष असलेला रयत क्रांती संघटना गेल्या अनेक वर्षापासून सोबत लोकसभा, विधानसभेमध्ये काम करत आहे. रयत क्रांती संघटना ही शेतकरी नेते तथा माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी राज्यात शेतकरी, कामगार प्रश्नावर आक्रमक काम करणारी संघटना म्हणून ओळखली जाते.
नांदेड जिल्ह्यामध्ये रयत क्रांती संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अतिशय आक्रमकपणे काम करत असते, रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नावर आक्रमकपणे आपली भूमिका मांडत, आंदोलनाच्या माध्यमातून सरकार दरबारी शेतकरी , कामगाराचा बुलंद आवाज करत जिल्ह्यामध्ये आपले स्थान निर्माण केलेले आहे.
नांदेड लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारात दि.२८ मार्च रोजी नायगांव येथे सभेचे आयोजन केले होते. या सभेला मित्र पक्ष असलेला रयत क्रांती संघटनेचा एकही कार्यकर्ता तथा पदाधिकारी उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे नायगाव तालुक्यातील भूमिपुत्र असलेले शेतकऱ्याचा आक्रमक चेहरा तसेच संघटनेचा युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी सुद्धा या सभेकडे पाठ फिरवली होती.
भाजपा सोबत आमची युती शेतकऱ्याच्या मुख्य प्रश्नावर झाली होती ,आज भाजपा शेतकऱ्याच्या प्रश्नापासून फार लांब गेलेली आहे, केंद्र सरकारचे धोरण हे शेतकऱ्याचे मरण ठरत आहे, त्यामुळे कदाचित आम्ही महायुतीमध्ये असून सुद्धा नांदेडच्या भाजपाने आम्हाला दूर ठेवण्याचे ठरवले असेल तर त्यांना शुभेच्छा, त्यांना जर आमची गरज नसेल तर आम्ही सुद्धा भाजपाशी बांधील नाही आहोत, आम्ही शेतकऱ्यांशी बांधील आहोत. अशी प्रतिक्रिया पांडुरंग शिंदे मांजरमकर, युवा प्रदेशाध्यक्ष ,रयत क्रांती संघटना यांनी दिली.