नांदेडमहाराष्ट्र

ज्येष्ठांचा आदर हाच त्यांच्या आनंददायी जीवनाचा मार्ग – मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल

नांदेड। ज्येष्ठांचा सन्मान करणे ही आपल्या संस्कृतीची मोठी देण आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या पाल्यांच्या जडण-घडणीसाठी अनेक कष्टही आनंदाने पार पाडत असतात. याची कृतज्ञतेनी जाणीव ठेवून मुलांनी पालकांना, घरातील ज्येष्ठांचा सन्मान व सेवा सुविधा देण्यावर भर दिला पाहिजे. त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा व आदरातच त्यांच्या आनंददायी जीवन जगण्याचा मार्ग असल्याचे, प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले.

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे ‘कर्तव्याचे देणे’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव व न्यायाधीश दलजीत कौर जज, सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, समाज कल्याण अधिकारी बापु दासरी, मानसोपचार तज्ञ डॉ. नंदकुमार मुलमुले, संधी निकेतन शिक्षण संस्थेचे निवृत्ती वडगांवकर, अर्थक्रांती, राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंचाचे विजय देशमुख, मराठवाडा प्रा. विभाग फेस्कामचे अध्यक्ष अशोक तेरकर व ज्येष्ठ नागरिकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

ज्येष्ठांची काळजी, निगा यासाठी कुटूंबासोबतच शासनही कटिबध्द आहे. शासनाच्या प्रत्येक विभागाच्या वतीने ज्येष्ठांना देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधाबाबत शासनाचा निर्णय आहे. तसेच त्यांना सन्मानाने जगण्यासाठी अनेक सक्षम कायदे शासनाने केलेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी आपले जीवन सुसह्य करण्यासाठी वेळ प्रसंगी कायद्याचा आधार घेवून निर्भयपणे जीवन जगावे असे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले. तसेच ज्येष्ठ नागरिक अधिनियम 2011 च्या कायद्याचे महत्व उपस्थित नागरिकांना सांगितले. परंतु समाजाने सामाजिक भावनेची जाण ठेवून या कायद्याची अंमलबजावणी करण्याची वेळ येवू नये असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जीवन जगत असताना ज्येष्ठांनी आपल्या जगण्यातला आनंद शोधला पाहिजे. गरज असेल तरच पाल्यांच्या आयुष्यात लक्ष द्यावे. अन्यथा आपण आपले छंद जोपासण्यावर भर देवून आपले आयुष्य आनंदी जगण्यावर भर दिला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांचे कर्तव्य, कामे करण्यासाठी मी त्यांच्या मुलांप्रमाणे सदैव तत्पर असल्याचे मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सांगितले.

ज्येष्ठांना सन्मानजनक वागणूक देणे हे आपले कर्तव्य -न्या. दलजीत कौर जज

घरातील प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन अधिक मोलाचे असते. त्यांच्या फार काही अपेक्षा नसतात. त्यांना आवश्यक असणाऱ्या आरोग्याच्या मुलभूत सुविधा देण्यावर पाल्यांनी भर देवून त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी सकारात्मक रहावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश दलजीतकौर जज यांनी केले. आपल्याला मोठे करताना आई-वडील त्यांचे सर्व कर्तव्य निस्वार्थ भावनेने पार पाडत असतात. आता आपण त्यांच्या जीवनाच्या संध्याकाळी आनंदी जीवन जगण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडून आपल्या कर्तव्याची पूर्ती करणे यावर भर दिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

आयुष्य हे सुखाच्या शोधाची वाट असून सुखाच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. यश, सुख, आनंद, समाधान या संकल्पनावर आधारित मानवाचे आयुष्य असते यांचे विस्तृत भाष्य मानसोपचार डॉ. नंदकुमार मुलमुले यांनी केले. तसेच निरपेक्ष भावनेने इतरासाठी काही करणे यात आनंदाची अर्थपूर्णता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक माणसात क्षमाशीलता असली पाहिजे त्यामुळे अनेक समस्या सुटतात. तसेच विपरीत परिस्थितीत संयम ठेवून जीवनावर प्रेम केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. ‘सुखाच्या शोध’ या विषयावर बोलतांना त्यांनी अनेक अनुभव सांगितले.

कुटूंबियांसोबत जगताना काही समस्या निर्माण झाल्या तर अनेक कायदे आहेत पण त्यात समाधान नाही. कायद्यापेक्षा प्रेमाने समजावण्यावर भर द्यावा. आपल्या पाल्यांना शिक्षण देतांना आपण आपली संस्कृती विसरत आहोत. मुल घडविणारी शिक्षण पध्दती आपण स्विकारली पाहिजे. त्यामुळे अनेक समस्या आपोआप संपतील असे संधीनिकेतन संस्थेचे सचिव निवृत्ती वडगावकर यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांना प्रसन्न व प्रतिष्ठेची जीवनसंध्या होण्यासाठी उच्च दर्जाच्या सेवा-सुविधा देणे हे समाजाचे, शासनाचे कर्तव्य असल्याचे अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंचचे विजय देशमुख यांनी सांगितले. समाज कल्याण कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, फेस्काम मराठवाडा प्रादेशिक विभाग नांदेड यांच्यावतीने आयोजित कर्तव्याचे देणे या कार्यक्रमात ॲड . मनिषा गायकवाड यांनी जेष्ठ नागरिकांसाठी असलेले कायदे याबाबतची माहिती दिली.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!