देश-विदेश

प्रगत तंत्रज्ञानाद्वारे भारतीय रेल्वेचा कायाकल्प – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई| भारतीय रेल्वे ही प्रवाशांच्या सुविधेसह देशातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांच्या प्रगतीची वाहक आहे. रेल्वे यंत्रणेत अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसह भारतीय रेल्वेचा कायाकल्प होत असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. मागील दहा वर्षात रेल्वेच्या विविध यंत्रणात अभूतपूर्व बदल झाले असून रेल्वेसाठीच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी व प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देतानाच भारतीय रेल्वे पर्यावरणपूरक होत आहे ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मध्य व पश्चिम रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानके व रेल्वे उड्डाणपुल व रेल्वे अंडरपासच्या भूमीपूजन व लोकार्पण, उद्घाटन कार्यक्रम झाला. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. मरिन लाईन्स रेल्वे स्थानक, मुंबई येथे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी आमदार राज पुरोहित, अपर महाप्रबंधक प्रकाश मिश्र हे उपस्थित होते. 41 हजार कोटीचे रेल्वे प्रकल्प, अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत 554 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, 1500 ओव्हर ब्रीज आणि अंडरपासचे भूमीपूजन व लोकार्पण, उद्घाटन यावेळी करण्यात आले.

प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, देशात विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर व प्रचंड गतीने होत आहेत. याद्वारेच रोजगारासाठीही मोठी चालना मिळत आहे. रेल्वे यंत्रणाही वेगाने बदलत आहे. रेल्वेचा कायापालट होत आहे. रेल्वेस्थानके अत्याधुनिक सुविधांनी युक्त करण्यासाठी अमृत भारत रेल्वेस्टेशन योजनेचा आरंभ करण्यात आला. या अत्याधुनिकीकरणामुळे रेल्वे स्थानक परिसरात रोजगार निर्मितीलाही मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. अमृत भारत स्टेशन योजना विरासत आणि विकास या दोन्हीचे प्रतिक आहे. प्रत्येक रेल्वेस्थानकाची उभारणी ही तेथील सांस्कृतिक, ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित असणार आहे. या स्थानकांमध्ये दिव्यांग आणि वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा असणार आहेत. रेल्वेचे मोठ्या प्रमाणावर विद्युतीकरण करण्यात येत आहे. रेल्वे स्थानकावरील स्वच्छता हे आज वैशिष्ट्य झाले आहे. भारतीय रेल्वे देशवासीयांसाठी ‘ ईज ऑल ट्रव्हल’ झाले आहे. भारतीय रेल्वे विभागाच्या अत्याधुनिकीकरणासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. ‘ वन नेशन वन प्रॉडक्ट’ ही योजनाही रोजगार निर्मितीला चालना देणारी ठरत असल्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या महानगरातून दररोज किमान ७३ लाख प्रवासी उपनगरी रेल्वेने प्रवास करतात. एवढ्या संख्येने प्रवास करणारे प्रवासी असलेले हे एकमेव शहर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील २०५१ विविध रेल्वे प्रकल्पांचं भूमिपूजन झाले ही विशेष आनंदाची बाब असून या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांचा समावेश असून ५६ स्थानकांचा त्यात समावेश आहे.

महाराष्ट्रात रेल्वे पायाभूत सुविधांची अभूतपूर्व उभारणी
महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून मोठी मदत होत आहे. सध्या राज्यात २२७४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अमृत भारत स्टेशन, रोड ओव्हर ब्रीज (ROB) आणि रोड अँडर ब्रीज (RUB) असे २४१ रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. यावर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी १५ हजार ५५४ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ५६ स्थानके जागतिक दर्जाची रेल्वे स्थानके म्हणून विकसित करण्यात येणार आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे अन्य इन्फ्रा प्रोजेक्टप्रमाणे महाराष्ट्रातील रेल्वे मार्गांच्या विस्ताराला बळ मिळत आहे. राज्यातील रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठीही केंद्राचे विशेष पाठबळ लाभत आहे. वंदे भारत या श्रेणीतही महाराष्ट्राला सात नव्या रेल्वेगाड्या मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे देशातील वंदे भारत रेल्वेगाड्यांची निर्मिती लातूर येथील कारखान्यात होणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या महत्वाकांक्षी प्रकल्पातील अडथळेही दूर करण्यात आले असून या मार्गासाठी आवश्यक असलेली भूसंपादनाची प्रक्रीया जवळपास पूर्ण झाली आहे. लवकरच बुलेट ट्रेनचे काम पूर्ण होऊन भारतातील पहिली बुलेट ट्रेन धावायला लागेल.

प्रवाशांना सुखकर, गतिमान प्रवासाचा अनुभव
रेल्वे प्रवाशांना सुखकर प्रवास करता यावा यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना नक्कीच यश येत आहे. रेल्वेच्या विविध प्रकल्पांमुळे प्रवाशांना सुखकर, गतिमान प्रवासाचा अनुभव मिळतानाच रेल्वे स्टेशन्सचे रुप पालटलेले दिसत आहे. एसी लोकल सुरू झाल्या आहेत.त्यांची संख्याही वाढविण्यात येत आहे.

महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांची उभारणी
मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. या लौकीकाला साजेसे योगदान मिळाले पाहिजे याची खबरदारी घेण्यात येत आहे. रस्ते विकासांचे असे इतर अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प दृष्टीपथात आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचे (अटलसेतू) लोकार्पण झाले. काही दिवसात मुंबई कोस्टल रोडचे देखील उद्घाटन होईल. महाराष्ट्राला देशाचे ग्रोथ इंजिन म्हटले जाते. देशातील सर्वाधिक पायाभूत सुविधांची कामे महाराष्ट्रात सुरू आहेत हे अभिमानास्पद आहे. राज्यात ८ लाख ३५ हजार कोटी रुपये खर्चाची विक्रमी विकासकामे सुरू आहेत. केंद्र सरकारचं भक्कम पाठबळ आहेच.

मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी नरीमन पॉईंट ते वरळी या ११ किमी लांबीच्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. कोस्टल रोडमुळे सुमारे ७० टक्के वेळ आणि ३४ टक्के इंधनाची बचत होईल, प्रदूषण कमी होणार असल्याने मुंबईकरांचे जीवनमान सुधारण्यासही मदत होईल. मुंबईत ३३७ किमी लांबीचे मेट्रो नेटवर्क टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. उर्वरीत मेट्रो रुटही पुढील दोन ते तीन वर्षांत कार्यान्वीत होतील. मेट्रो कनेक्टीविटीमुळे ‘एमएमआर’च्या रस्त्यांवरील किमान ३० ते ३५ लाख वाहने कमी होतील असा अंदाज आहे. प्रवाशांच्या वेळेची बचत होईल. त्यांना आरामदायी प्रवास करता येईल. प्रदुषण कमी होईल आणि इंधनाचीही बचत होईल.

देशात रेल्वे मार्गाच्या जाळ्याचे विस्तारीकरण – रेल्वेमंत्री अश्व‍िनी वैष्णव
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, रेल्वे स्थानकांच्या अत्याधुनिकीकरणाचे मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. देशात जम्मू काश्मीर आणि पूर्वोत्तर राज्यांसह रेल्वे मार्गाचे जाळे विस्तारले जात आहे. वंदे भारत रेल्वे वैशिष्ट्यपूर्ण ठरली असून काही दिवसात जागतिक मानकांच्या पूर्ततेनंतर या प्रणालीच्या निर्यातीसंदर्भातही विचार करण्यात येत आहे. अमृत भारत रेल्वेही यशस्वी ठरली आहे. भारतीय रेल्वे पर्यावरणपूरक होत असल्याचेही श्री. वैष्णव यांनी सांगितले. यावेळी रेल्वे विभागाच्या वतीने आयोजित विविध प्रकारच्या स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुनर्विकास योजनेचा शुभारंभ राज्यपाल, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत भायखळा स्थानक येथे रेल्वेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज देशातील अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत ५५४ रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंतप्रधानाच्या हस्ते १५८५ रोड ओवर ब्रिजेस तसेच भूमिगत मार्गिकांच्या निर्मितीसाठी बांधकामाच्या कोनशिलांचे देखील अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचा भाग म्हणून मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेतर्फे राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तसेच पालकमंत्री दीपक केसरकर, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थित रेल्वे अधिकारी, कर्मचारी व निमंत्रितांना संबोधित करताना राज्यपालांनी भायखळा स्टेशन हे मुंबईतील सर्वात जुन्या स्थानकांपैकी एक असल्याचे सांगितले. देशातील पहिली रेल्वे बोरीबंदरहून सुटल्यावर ठाणे येथे जाताना भायखळा स्टेशनवर थांबली होती असा संदर्भ नमूद करून आज एकाच वेळी अनेक स्टेशनच्या पुनर्विकास प्रकल्पाची सुरुवात होऊन रेल्वेच्या इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचे त्यांनी सांगितले.

देशात १५८५ ओव्हर ब्रिज आणि अंडर पासेस निर्माण केल्यामुळे रेल्वे क्रॉसिंगवर होणारे अपघात तसेच वेळेचा व इंधनाचा अपव्यय कमी होईल असे राज्यपालांनी सांगितले. महाराष्ट्रातील ५६ रेल्वे स्थानके आणि १९२ ओव्हर ब्रिज आणि भूमिगत मार्गिकांच्या नूतनीकरणाचा या योजनेत समावेश केल्याबद्दल राज्यपालांनी केंद्राचे आभार मानले. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे. अशावेळी देशाची जीवनरेखा असलेली रेल्वे देखील उत्कृष्टच असली पाहिजे, या दृष्टीने अमृत भारत स्टेशन योजना महत्वाची आहे असे राज्यपालांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांत भारतातील प्रत्येक राज्य आणि जिल्ह्याला रेल्वेने जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे एकता आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे सांगून राज्यपालांनी रेल्वेचे अभिनंदन केले. यावेळी मुलांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला व निबंध लेखन स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!