साधना करून वास्तूदोषांचा हानीकारक प्रभाव कमी करा – राज कर्वे, ज्योतिष विशारद आणि वास्तूशास्त्र अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
मुंबई| ‘ज्याप्रमाणे वास्तूचा परिणाम व्यक्तीवर होतो, त्याचप्रमाणे व्यक्तीचाही परिणाम वास्तूवर होत असतो. साधना करणार्या व्यक्तीचा सकारात्मक परिणाम वास्तूवर होऊन वास्तूदोषांचा हानीकारक प्रभाव न्यून होतो’, असे प्रतिपादन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे ज्योतिष विशारद आणि वास्तूशास्त्र अभ्यासक श्री. राज कर्वे यांनी केले. नुकतेच आगरतळा, त्रिपुरा येथे झालेल्या ‘नॅशनल सेमिनार ऑन कन्ट्रिब्यूशन ऑफ वास्तूशास्त्र इन मॉडर्न कन्टेक्स्ट’ या परिषदेत श्री. राज कर्वे बोलत होते. त्यांनी ‘वास्तूशास्त्रानुसार वास्तू-निर्मिती करण्याचे लाभ, तसेच वास्तूदोषांच्या निवारणासाठी सुलभ आध्यात्मिक उपायांच्या जोडीला ‘साधना करण्याचे महत्त्व !’ हा शोधनिबंध सादर केला, ज्याचे मार्गदर्शक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे असून लेखक श्री. कर्वे हे आहेत.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ऑक्टोबर 2016 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत 18 राष्ट्रीय आणि 93 आंतरराष्ट्रीय, अशा एकूण 111 वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी 13 आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण’ पुरस्कार मिळाले आहेत.
श्री. राज कर्वे यांनी सांगितले की, वास्तूशास्त्रानुसार घराचे प्रवेशद्वार योग्य पदात (जागेत) असल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते, याउलट प्रवेशद्वार निषिद्ध पदात असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. हे वैज्ञानिक उपकरण वापरून केलेल्या प्रयोगातूनही दिसून आले. थोडक्यात वास्तूशास्त्रानुसार घर बांधल्याने घरात सकारात्मक स्पंदने निर्माण होऊन व्यक्तीला सुख आणि शांती प्राप्त होते.
श्री. राज कर्वे यांनी पुढे सांगितले की, वास्तूशास्त्रानुसार घर बांधल्याने घरात सकारात्मक स्पंदने निर्माण झाली, तरी ती टिकून रहाणे हे घरात रहाणार्या व्यक्तींच्या आचरणावर अवलंबून आहे. व्यक्तीमध्ये स्वभावदोष आणि अहं यांचे प्रामण अधिक असल्यास तिच्याकडून अयोग्य आचरण होऊन वास्तूत नकारात्मक स्पंदने निर्माण होतात, याउलट व्यक्तीत चांगले गुण अधिक असल्यास तिच्याकडून योग्य आचरण होऊन वास्तूत सकारात्मक स्पंदने निर्माण होतात.
साधनेमुळे व्यक्तीतील स्वभावदोष आणि अहं न्यून होऊन सद्गुण वाढतात, तसेच व्यक्तीतील रज आणि तम हे गुण न्यून होऊन तिच्यात सत्त्वगुण वाढतो. याचा शुभ परिणाम वास्तूवर होऊन ती सकारात्मक (सात्त्विक) बनते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संतांची वास्तू ! संत साधनारत असल्याने ते ज्या वास्तूत निवास करतात, ती वास्तू सात्त्विक होते. त्यामुळे संतांचे जन्मस्थान, निवासस्थान, त्यांनी वापरलेल्या वस्तू इत्यादी जतन करण्याची परंपरा भारतात आहे. याबाबत संशोधनही मांडण्यात आले.’