
नांदेड| बालकांचे भावविश्व समजून घेऊन आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात त्यांना साहित्याची ओढ लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी नवनवीन विषय, नवे विज्ञान, नवे बदल समोर ठेवून बालकविता, बालकथा लिहिल्या पाहिजेत. आणि या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कवी माधव चुकेवाड यांनी ‘वाचू गाऊ नाचू आनंदे’ हा बालकांवर उत्तम संस्कार करणारा बालकवितासंग्रह आपल्या हाती दिला आहे असे उद्गार मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी काढले.
कवी माधव चुकेवाड यांच्या ‘वाचू गाऊ नाचू आनंदे’ या बालकवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ‘किशोर’ मासिकाचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे, देवीदास फुलारी, प्रा. डॉ. रामचंद्र काळुंखे, बालाजी इबितदार व प्रमुख उपस्थिती के. एस. अतकरे यांची होती.
प्रारंभी दीपप्रज्वलन करून सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले शारदास्तवन तनया प्रसाद आलूरकर हिने कथ्थक नृत्याच्या माध्यमातून सादर केले. मान्यवरांच्या स्वागतानंतर प्रास्ताविक इसाप प्रकाशनाचे संचालक दत्ता डांगे यांनी केले. किरण केंद्रे यांच्या हस्ते ‘वाचू गाऊ नाचू आनंदे’ कविता संग्रहाचे प्रकाशन झाले. याप्रसंगी या पुस्तकाची संपूर्ण चित्रे रेखाटणारे चित्रकार शीतल शहाणे व अक्षरजुळणीसह मांडणी आणि सजावट करणारे विजयकुमार चित्तरवाड यांचा सत्कार करण्यात आला. मनोगत माधव चुकेवाड यांनी केले. त्यांनी आपणांवर आई, वडिलांचे तसेच साधूसंतांचे संस्कार आहेत आणि तेच संस्कार माझ्या लेखणीतून उतरतात असे म्हटले. आपण बालसाहित्यात नवनवीन प्रयोग केले असल्याचेही सांगितले.
पुढे बोलताना ठाले पाटील म्हणाले की, पूर्वीच्याच तऱ्हेची ‘कडगुलं मडगुलं’सारखी बालगीतं आजच्या घडीला लिहून चालणार नाहीत. आजच्या बालकांचे भावविश्व समजून घेऊन नवीन प्रकारची बालगीते लिहिली पाहिजेत. चुकेवाड यांनी सुंदर बालकविता लिहिल्या असून पुस्तक सर्वांगसुंदर निघाले आहे. यात मुले रमतील असेही ते म्हणाले.
पुस्तक वाचणारे मूल छान दिसते ! – ‘किशोर’चे कार्यकारी संपादक किरण केंद्रे
बालकवींमध्ये बालसुलभता असली पाहिजे. आपण काय लिहितो हे बालकुमारांना कळले पाहिजे. आणि माझ्या जगण्याचा किंवा लिहिण्याचा गाभा मूल हे असेल तरच उत्तम प्रकारची बालसाहित्य निर्मिती होऊ शकते. आजच्या जगाचे दर्शन बालसाहित्यात घडले पाहिजे. अशा बालसाहित्यात मुले रममाण होतील. आणि साहित्यात रममाण झालेली, पुस्तकं वाचत असलेली मुलं सुंदर दिसतात! असे उद्गार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘किशोर’ मासिकाचे कार्यकारी संपादक किशोर केंद्रे यांनी काढले.
आपले साहित्यिक स्वतःच्याच बालपणातील गोष्टी, कविता लिहिते आहे परंतु सध्याची पिढी वेगाने घडते आहे. तेव्हा ही परिस्थिती पाहून लेखन केले पाहिजे. आणि तसे लेखन होत नसेल, मुलं ते वाचत नसतील तर मग उद्या मोठ्यांचेही साहित्य कोणी वाचणार नाही. त्याकरिता बालसाहित्यिकांनी सजग झाले पाहिजे. मुलांसाठी लिहितो तोच मोठा माणूस असतो
साहित्यावर कोणाचीच मक्तेदारी नाही. ते कोणीही लिहू शकते. असे सांगून साहित्याचे केंद्रस्थान हे उद्या ग्रामीण भागच असणार आहे असेही त्यांनी म्हटले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना देवीदास फुलारी यांनी आज माणसांची नीतिमत्ता घसरत आहे. ती सुधारावयाची असेल तर उत्तम प्रकारचे साहित्य बालकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. असे सांगून माधव चुकेवाड यांचा बालकवितासंग्रह त्यादृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे असे मत व्यक्त केले.
समीक्षक प्रा. डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी ‘वाचू गाऊ नाचू आनंदे’ हा लयबद्ध शीर्षक असलेला बाल कवितासंग्रह मुलांना आवडणारा आहे. कवी चुकेवाड यांनी बालकांच्या मनाला भावतील, गुणगुणाव्याशा वाटतील अशा लिहिल्या आहेत. मनोरंजन करीत करीतच त्यांनी नकळतपणे नैतिक मूल्यांची रुजवणूकही केली आहे असे म्हटले.
बालाजी इबितदार यांनी म्हटले की, हा कवितासंग्रह वाचून बाल-कुमार नक्कीच गायला लागतील अन् गाता गाता नाचायलाही लागतील असा सुंदर काव्यसंग्रह आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धाराशिव शिराळे यांनी अत्यंत सुंदर तऱ्हेने केले. तर आभार अनिल आलूरकर यांनी मानले. समारंभास प्रा डॉ. जगदीश कदम, प्रा. भगवान अंजनीकर, प्रा. डॉ. पी. विठ्ठल, शंतनु डोईफोडे, सौ. अलका चुकेवाड, लक्ष्मण मलगिरवार, देवीदास तारू, आशा पैठणे, स्वाती कान्हेगावकर, मीनाक्षी आचमे, निर्मलकुमार सूर्यवंशी, प्रा. वैजनाथ अनमुलवाड प्रा. महेश मोरे, आनंद पुपलवाड, शिवाजी आंबुलगेकर, वीरभद्र मिरेवाड, अमृत तेलंग आदी साहित्यिक व साहित्यरसिक मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.
