नांदेड| परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध दारू, मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी, क्रिकेट बेटिंग, गुटखा, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, वाळू उपसा व वाहतूक अवैध प्रवासी वाहतूक इत्यादींना आळा घालण्यासाठी, पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी दिनांक 1 मे पासून, नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी अभियान सुरू केले आहे.

पोलिसांनी, मे महिन्यात राबविलेल्या अवैध व्यवसायविरोधी अभियान-1 दरम्यान, अवैध व्यवसायांत गुंतलेल्या 1721 इसमांचे विरुद्ध एकूण 1561 केसेस करून, 7,79,47,045/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. सदर कारवाईनंतर, दिनांक 1 जून पासून, नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी अभियान-2 सुरू करण्यात आले होते. यादरम्यान, अवैध व्यवसायांत गुंतलेल्या 2316 इसमांचे विरुद्ध एकूण 2017 केसेस करून, 6,93,60,364/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन पोलीसांनी अवैध व्यवसायांचे विरोधात सुरू केलेली मोहीम आणखी तीव्र केली आहे. जून महिन्यात परिक्षेत्रातील चारही जिल्हयांनी केलेली कामगिरी खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. | जिल्हा | एकुण केसेस | आरोपी संख्या | जप्त मुद्येमाल |
1 | नांदेड | 633 | 786 | 57,16,736 |
2 | परभणी | 463 | 517 | 1,89,61,134 |
3 | हिंगोली | 476 | 493 | 96,63,156 |
4 | लातूर | 445 | 520 | 3,50,19,338 |
एकूण | 2017 | 2316 | 6,93,60,364 |
उपरोक्त कारवाई दरम्यान, नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेने लोहा पोलीस ठाण्याचे हद्दीत गांजाची वाहतूक करताना दोन इसमांना पकडून त्यांचे कडून एकूण 14,13,500/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, सहा. पोलीस अधीक्षक, उपविभाग चाकूर यांनी पोस्टे अहमदपुर जि. लातूर हद्यीत 1,46,98,000/- रुपयाची वाळू जप्त करून चांगली कामगिरी केली आहे. सदर कामगिरी बाबत, पोलीस उपमहानिरीक्षक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

(19) अवैध व्यवसायिक हद्यपार,तर एकावर MPDA अंतर्गत कारवाई : अवैध व्यवसायांत गुंतलेल्या (19) इसमांना हिंगोली पोलीसांनी हद्यपार केले असून, नांदेड पोलीसांनी हातभटटी दारु व्यवसायाशी निगडित एका इसमास महाराष्ट्र झोपडपटटीदादा, अवैध धोकादायक व्यक्ती आणि अंमली पदार्थ विक्रेत्यांविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई अधिनियम 1981 (MPDA) कायद्यांखाली एक वर्षासाठी स्थानबध्द केले असून, दिनांक 17.06.2025 रोजी त्याची रवानगी छत्रपती संभाजीनगर कारागृहात करण्यात आली आहे. परिक्षेत्रातील अवैध व्यवसायायिकांची यादी एकत्रित करण्यात येत असून, त्यांचेविरुध्द करावयाच्या कारवाईचे नियोजन सुरु आहे.
दिनांक 1 जुलै पासून परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी ‘अवैध व्यवसाय विरोधी अभियान-3’ राबविण्यात येत असून,संपूर्ण जुलै महिन्यात हे अभियान सुरु राहील. सदर मोहिमेदरम्यान अचानकपणे राबविण्यात येणाऱ्या किमान (4) मासरेडचा समावेश असुन, गुटखा बंदीसाठी व्यापक वाहन व साठवणूक ठिकाणांच्या तपासणीची मोहिम हाती घेण्यात येणार आहे. आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाच्या nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर कळवून अशा अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी आपला हातभार लावावा, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.
