महाशिवरात्र निमित्त श्रीपरमेश्वर देवस्थानच्या भव्ययात्रा महोत्सवाचे आयोजन; ७ लाखाची भव्य बक्षिसे
हिमायतनगर, अनिल मादसवार| सबंध महाराष्ट्र – आंध्रप्रदेश – कर्नाटक, तेलंगणा राज्यात ख्यातीप्राप्त असलेल्या हिमायतनगर (वाढोणा – वारणावती) येथील श्री परमेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वाढोण्याच्या श्री परमेश्वराची भव्यदिव्य यात्रा दि.07 मार्च पासून सुरु होणार असून, दिनांक 22 मार्च 2024 पर्यंत चालणार आहे. श्री परमेश्वराच्या यात्रा महोत्सवात भाविक – भक्त, व्यापारी, कलावंत, खेळाडू, भजनी मंडळ व खेळ आणि पशु प्रेमींनी हजेली लावून श्री दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे विश्वस्त व गावकरी मंडळींनी न्यूजफ्लॅश 360च्या माध्यमातून केले आहे. यात्रा महोत्सवानिमित्त भरगच्च धार्मिक – सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व खास करवून शेतकऱ्यांसाठी पशु आणि भव्य शंकरपट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात्रा उत्सव काळात होणाऱ्या विविध स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी तब्बल 7 लक्ष रुपयाची भव्य बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. श्री परमेश्वराचा यात्रा उत्सव हा १५ दिवस चालणार असून, यात्रेला गुरुवार दि.07 मार्चपासून होऊन मंगळवार दि.22 मार्च शुक्रवार पर्यंत चालणार आहे. दरम्यान सुरुवातीचे सात दिवस काकडा आरती, हरिपाठ, अखंड हरिनाम, ज्ञानेश्वरी व वीणा पारायण सोहळा, किर्तन, प्रवचनाने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण चालणार आहे. यात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे मुख्य व्यासपीठ हभप.श्री परमेश्वर महाराज कदम डोल्हारीकर हे सांभाळणार आहेत. विना, काकडा – भजन, हरिपाठ हे परमेश्वर भजनी मंडळीच्या सहकार्याने संपन्न होणार आहे. सप्ताहोतील सहा दिवस दररोज दुपारी 4 ते 5 च्या वेळेत प्रवचन होणार आहे. तर महाशिवरात्रीला सकाळी 4 ते 5 पर्यंत शिवलीलामृत ग्रंथाचे होईल. सात दिवसाच्या कालावधीत नामांकित कीर्तनकार हभप.पुरुषोत्तम महाराज आळंदी देवाची, हभप.सुरेश महाराज पोफळीकर, हभप.महेश महाराज महाजन आळंदी, हभप. मयूर महाराज कोंडे, पुणेकर, हभप.आचार्य अर्जुन महाराज, लाड गुरुजी, आळंदी, हभप. भीमराव महाराज सूर्यवंशी, फुटाणकर, हभप.स्मिताताई आजेगावकर, पुणे, यांच्या मधुर वाणीतून उपस्थितांना भक्तीचा मार्ग दाखविला जाणार आहे. तसेच सप्त्याच्या शेवटच्या दिवशी हभप दत्तात्रेय महाराज फुलारी गुरुजी, लातूरकर यांचे गोपाळकाला दहीहंडी काल्याचे कीर्तन होऊन काल्याच्या प्रसादाचे वितरण व शहरातील मुख्य रस्त्यावरून राधा – कृष्ण झाकीची मिरवणूक ढोल ताश्याच्या गजरात काढण्यात येणार आहे.
माघ कृ.13 शुक्रवार दि.08 महाशिवरात्री दिनी पारण्याचा उपवास धरणाऱ्या व दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना बुलढाणा अर्बन बैंक आणि पावन फर्निचर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान पाच पुरोहिताच्या मंगल वाणीत महाशिवरात्री दिनी मध्यरात्री १२ ते ०३ वाजेच्या दरम्यान श्री परमेश्वराचा महाअभिषेक सोहळा, महापूजा ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष मा.तहसीलदार यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर मंगलमय सोहळ्यात श्रीचा अलंकार सोहळा संपन्न होईल. दुसऱ्या दिवसापासून भाविक – भक्तांना अलंकार रुपी श्री परमेश्वराचे दर्शन दि.14 मार्च २024 गुरुवार दहीहंडी काल्यापर्यंत घेता येणार आहे.
सहा दिवस ब्राम्हण, कुणबी मराठा, माळी, आर्यवैश्य, पद्मशाली, मन्नेरवारलू, वीरशैव या समाज बांधवांच्या वतीने परंपरागत पंगतीचा कार्यक्रम होणार आहे. आणि यंदा दि.13 मार्च रोजी संतोष रेखावार यांच्या वतीने पाचवी पंगत होणार आहे. त्यानंतरच्या काळात शालेय विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दि.15 रोजी यात्रेतील विविध कार्यक्रम व स्पर्धा यात बडबड गीत स्पर्धा रात्री 7 ते 10 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. शनिवार दि.16 रोजी लहान मुले व मुलींसाठी भव्य फैन्सी ड्रेस स्पर्धा सकाळी 11 ते 03 या वेळेत संपन्न होणार आहे. रविवार दिनांक 17 रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय खेळ कब्बडी स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. यात प्रथम येणाऱ्या संघास 21000 प्रथम क्रमांकाचे बक्षीस श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने जाहीर करण्यात आले असून, दुसरे बक्षीस 15000 रुपये, तिसरे बक्षीस 9000 रुपये ठेवण्यात आले आहे.
सोमवार दि.18 रोजी रात्री 08 ते 11 च्या दरम्यान शालेय विविध गुणदर्शन स्पर्धा होणार आहे, यात विजेत्या गटसमूहाला प्रथम बक्षीस 15000 रुपये, दुसरे 10000, तृतीय 5000 रुपये आणि प्रोत्साहनपर बक्षीस ठेवण्यात आले आहे. सोमवार दि.18 रोजी भव्य शंकरपटाला सुरुवात होणार असून, दि.19 रोजी फायनल होणार आहे. हि शंकरपट स्पर्धा पळसपूर रोडवर असलेल्या पेट्रोल पंपाच्या समोरील मैदान दोन गटात होणार आहे. शंकर पट स्पर्धेतील अ गटात प्रथम येणाऱ्या बैलजोडीस 51000 रुपये, दुसरे 31000 रुपये, तिसरे बक्षीस 21000 बक्षीस यासह अनेक बक्षीस दिले जाणार आहे. तसेच शंकर पट स्पर्धेतील ब गटात प्रथम येणाऱ्या बैलजोडीस 21000 रुपये, सुसरे बक्षीस दुसरे 10555 रुपये, तिसरे बक्षीस 9999 बक्षीस यासह अनेक बक्षीस दिले जाणार आहेत. बुधवार दिनांक 20 मार्च रोजी भव्य पशुप्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे यात गावरान बैलजोडी, लाला कंधारी बॊलजोडी, गावरान वळू, गावरान गाय, गावरान कालवड, लाल कंधारी गाय, लाल कंधारी कालवड आदींचा समावेश राहणार असून, यात प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षिसे दिली जाणार आहेत.
दिनांक 20 मार्च रोजी भजनी मंडळ व संगीत प्रेमींसाठी भव्य भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या मंडळास 31000 रुपयाचे बक्षीस, दुसरे बक्षीस 15000 रुपये, तिसरे बक्षीस 7500 यासह अनेक बक्षिसे दिली जाणार आहे. दिनांक 21 मार्च रोजी महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, यात विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच दिनांक 22 मार्च रोजी कुस्ती शौकिनांसाठी भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत मानाची कुस्ती होणार असून, यात जिंकणाऱ्या मल्लास प्रथम क्रमांकाचे 21000 रुपयाचे बक्षीस, दुसरे बक्षीस 11000 तिसरे बक्षीस 5000 यासह 1000 रुपयाच्या बक्षिसाचे अनेक कुस्त्या संपन्न होणार आहेत. दि.22 मार्च रोजी यात्रा उत्सवाचा समारोप यात्रा काळात सहकार्य करणाऱ्या सर्वांच्या सत्काराने केला जाणार आहे.
महाशिवरात्री यात्रेची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असून, त्या निमित्ताने मंदिराची रंग रांगोटी करण्यात आली आहे. श्री परमेश्वराचा यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी विविध प्रकारच्या 15 समित्यांची स्थापना करण्यात येउन, त्यांच्यावर संबंधित कार्यक्रम शांततेत यशस्वी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी महाशिवरात्री यात्रा महोत्सवाच्या पर्व काळात सर्व – भाविक भक्तांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन मा.तहसीलदार हिमायतनगर, मंदिर समितीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंतराव देवकते, जेष्ठ संचालक लक्ष्मण शक्करगे, राजेश्वर चिंतावार, देविदास मुधोळकर, प्रकाश कोमावार, श्याम पवणेकर, विठ्ठलराव वानखेडे, प्रकाश शिंदे, राजाराम झरेवाड, वामनराव बनसोडे, सौ.लताबाई पाध्ये, सौ.लताबाई मुलंगे, माधव पाळजकर, श्रीमती मथुराबाई भोयर, शांतीलाल श्रीश्रीमाळ, एड.दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, लिपिक बाबुराव भोयर व गावकरी मंडळी व सर्व समित्यांच्या वतीने करण्यात आले आहे.