अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 16 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणाचे आयोजन
नांदेड| गर्व्हमेंट ई मार्केट प्लेस (GEM) पोर्टलवरुन खरेदीत अधिकाधिक वापर करण्यासाठी तसेच पोर्टलवर नोंदणी तसेच पोर्टलच्या संपूर्ण वापरासाठी प्रशिक्षण देण्याचे शासनाने निर्देशित केलेले आहे.
त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शासकीय विभागातील खरेदी धोरणाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी 16 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत प्रशिक्षण आयोजित केले आहे. तरी जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय विभाग व त्यांच्या अधिनस्त कार्यालये, औद्योगिक संघटना, औद्योगिक समुह, उत्पादक घटक, पुरवठादार यांनी या प्रशिक्षणास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.
शासनाचे सर्व विभाग, शासकीय उपक्रम/महामंडळे व त्याअंतर्गत सर्व कार्यालयाकडून वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी शासनाने मानवी हस्तक्षेपाशिवाय व खरेदी प्रक्रीया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यासाठी गर्व्हमेंट ई मार्केट प्लेस (GEM) पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलचा अधिकाधिक वापर करुन पोर्टलद्वारे वस्तू व सेवांची खरेदी करण्यास शासकीय, निमशासकीय व स्वायत्त संस्था यांना बंधनकारक करण्यात आलेले आहे असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.