
नांदेड/माहूर| पेसा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या मौजे वझरा ता.माहूर येथील गाव विस्तार वाढीचा मार्ग मोकळा झाला असून सीटू कामगार संघटनेने माहूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री सुरेश कांबळे, ग्राम विस्तार अधिकारी श्री केंद्रे आणि सरपंच श्री दिपक केंद्रे यांचे आभार मानले आहेत.मागील पन्नास वर्षात मौजे वझरा येथे गाव विस्तार वाढ झाला नसल्यामुळे व प्लॉट्स पडलेले नसल्यामुळे गावकरी हैराण झाले होते. अनेकजन गाव सोडून परगावात स्थलांतरित होत आहेत. शासनाने नवीन प्लॉट्स द्यावेत व घरकुलासाठी पाच लाख रुपये अनुदान द्यावे ही प्रमुख मागणी घेऊन वझरा येथील नागरिक तथा सीटू कामगार संघटनेचे सभासद कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वझरा येथे दि. १ ऑक्टोबर पासून सहकुटुंब सामूहिक उपोषणास बसले होते.दि.३ ऑक्टोबर रोजी माहूर – किनवट विधान सभा मतदार संघाचे आमदार भीमराव रामजी केराम यांनी वझरा येथे प्रत्यक्षात भेट उपोषण सोडविले होते. निसर्गरम्य वातावरण, घनदाट सागवानी जंगल, शेख फरीद दरग्यावर अखंड कोसळणारा धबधबा,वरच्या डोंगरातून येणारा नाला आणि तो अडवून जोखीम पतकरून आणलेले साठवण तलाव,पर्यटन स्थळ अशी विविध ख्याती असलेल्या वझरा ता.माहूर येथील नागरिक मोठ्या संख्येने गावातील मारोती मंदिरा जवळील वाय पॉईंट येथे सामूहिक उपोषणास बसले होते.
एकीकडे झपाट्याने लोकसंख्या वाढत असताना आणि गांव,शहराचा विकास होत असताना मौजे वझरा शेख फरीद येथे मात्र मागील पन्नास वर्षात नवीन प्लॉट्स पडलेले नाहीत. त्याचे कारण असे की, वझरा येथे गावाखारीची जमीन खाजगी मालकाची नाही. चोहबाजूची सर्व जमीन ही श्री दत्त शिखर संस्थांनची आहे. अर्थातच मालक म्हणून असलेल्या महंत यांना आज पर्यंत प्लॉट्स पाडून गावठाण विस्तारवाढ करावा म्हणण्याची हिंमत कोणी केली नाही. हे सर्व कायदा म्हणून नाही तर श्रद्धा आणि भावनेचा मुद्दा आहे.दि.१५ ऑगस्टच्या ग्राम सभेत सीटू संलग्न मजदूर युनियनच्या मागण्या नुसार ठराव घेण्यात आला असून गावाकऱ्यांनी केलेल्या मागण्या नुसार मारोती मंदिरा जवळील व शांताबाई रेश्माजी जगदाळे यांचे घरापासून कै. गोविंदराव पाटील माध्यमिक शाळेपर्यंतची गावखरीची जमीन शासनाने अधिग्रहण करावी आणि सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने केलेल्या मागणी नुसार अर्जदारांना केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने घर बांधण्यासाठी रुपये पाच लाख देण्यात यावेत. त्यापैकी रुपये एक लाख स्वताच्या सहभाग म्हणून भरण्यास तयार आहेत. परंतु स्वसहभागाची रक्कम फेड करण्यासाठी वीस वर्षाचा वेळ द्यावा अशी मागणी केल्या प्रमाणे तसे १५ ऑगस्टच्या ग्राम सभेतील ठरावामध्ये नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आतापर्यंत मोर्चा,धरणे व उपोषणात केलेल्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे गावातील नागरिक संतप्त झाले होते. वझरा येथील मूळचे रहिवाशी असलेले कॉ.गंगाधर गायकवाड हे नांदेड येथे स्थायिक झाले असले तरी त्यांनी मागील दोन वर्षांपासून वझरा गावठाण विस्तारवाढ आणि सोलापूर कुंभारीच्या धरतीवर गावखारी येथे प्लॉट्स पाडून द्यावेत आणि घरकुल बांधण्यासाठी पाच लाख रुपये अनुदान स्वरूपात देण्याची मागणी जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारकडे सातत्याने केली आहे. दि.१२ डिसेंबर रोजी पेसा क्षेत्रात येत असलेल्या वझरा येथे विशेष ग्राम सभेचे आयोजन सरपंच आणि ग्राम विस्तार अधिकारी यांनी केले असून पेसा कायद्या नुसार ग्राम सभेत पारित झालेल्या ठरावा नुसार कार्यवाही करणे सरकारला बंधनकारक आहे.त्यामुळे पन्नास वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या ग्रामस्थांचा प्लॉट व घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
नांदेडचे जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांनी गाव विस्तार योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी यापूर्वीच हिरवा कंधील दाखविला असून स्थानिक प्रशासकीय यंत्रणा मात्र उदासीन होती.मात्र आता १२ डिसेंबर रोजी विशेष ग्राम सभा बोलावण्यात आली असल्यामुळे उपरोक्त मागण्या घेउन लढा देणाऱ्या सीटू कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. वझरा येथील ३०० अर्जदारांनी प्लॉट्स आणि अनुदान स्वरूपात घर बांधण्यासाठी रुपये पाच लाख देण्याची मागणी केली असून सूचित जमीन पुरत नसेल तर राजू टेंबरे यांच्या घरा समोरील रोड च्या लगतची जमीन अधिग्रहण करावी अशी मागणी देखील उपोषणार्थीनी केली आहे. पर्यटन स्थळ असलेल्या वझरा येथे आता गाव विस्तारिकरण योजनेत नवीन वस्ती मध्ये खुले मैदान,उद्यान, अभ्यासिका,वाचणालय,आरोग्य केंद्र, शाळा बालवाडी सुविधा मिळणे अपेक्षित आहे. सीटूच्या नेतृत्वाखाली अनेक मोर्चे आंदोलने झाली असून सातत्याने पाठपुरावा आहे.
उपोषण आणि आजपर्यंत ची यशस्वी आंदोलने करण्यासाठी स्थानिक कमिटीचे सचिव विक्रम टाकळीकर, उपाध्यक्ष जाणू पवार,बाबू टाकळीकर,सुनील चांदेकर, बाबू दोहिले, वाल्मिक मुंडे,ज्ञानेश्वर उरवते, केशव राठोड, प्रमोद कदम,चंद्रकांत लोखंडे,कॉ.लता गायकवाड, वंदनाबाई मुरकुटे, प्रयागबाई लोखंडे,रामदास लोखंडे,राजू टेंबरे,इंदिराबाई टेंबरे, रवी घुगे महिला कमिटीच्या अध्यक्षा अर्चना नटवे,सचिव मंगलबाई टेंबरे,सायनाबाई जाधव,वदंनाबाई कुमरे,भूमिका नटवे,मोहिनी केंद्रे,देवकबाई टेंबरे, पुर्नाबाई चव्हाण,शायनाबाई जाधव,तसेच पदाधिकारी राजू टेंबरे,कॉ.वाल्मिक मुंडे, प्रयाग प्रचाके, गयाबाई कुडमेथे,कॉ.विशाल मुंडे,आदी प्रयत्न केले आहेत. या संघर्षशील लढाईस सरपंच दिपक केंद्रे यांनी पूर्ण पाठींबा दिला असून गाव विस्तार योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कॉ. गंगाधर गायकवाड यांनी उपोषण स्थळी सांगितले.
