नांदेडच्या सचखंड गुरुव्दारा बोर्डाचे माजी अध्यक्ष तथा उद्योगपती सरदार भुपींदरसिंघ मन्हास यांचा निधन
नांदेड| नांदेडच्या सचखंड गुरुव्दारा बोर्डाचे माजी अध्यक्ष तथा उद्योगपती सरदार भुपींदरसिंघ मन्हास (७४) यांचे काल रात्री प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. हर्मन फिनोकेम. लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक होते.
जवळपास ६० हून अधिक देशात या कंपनीचा विस्तार असून, चार हजार कर्मचारी या उद्योगात कार्यरत आहेत. संभाजीनगर, शेंद्रा, मुंबई येथे तसेच देशातील वेगवेगळ्या ठिकाणी या कंपनीची कार्यालये कार्यरत आहेत. विशेष म्हणजे कोरोना काळात याच कंपनीच्या वतीने नांदेड शहर आणि जिल्ह्यात तसेच वेगवेगळ्या गुरुव्दारा परिसरात सॅनिटायझरचे या कंपनीने मोफत वाटप केले होते तसेच जिल्हा प्रशासनाला देखील अनेक ठिकाणी मोफत उपलब्ध करुन दिले होते. नांदेडच्या सचखंड गुरुव्दारा बोर्डाचे ते २०१८ ला अध्यक्ष झाले.
त्या काळात वेगवेगळ्या शैक्षणिक सुविधा, शीख समाजासाठी विविध सोयी सवलती, नांदेडच्या सचखंड गुरुव्दारा परिसरात विकासात्मक कामाचा आराखडा तसेच जगाच्या नकाशावर सचखंड गुरुव्दाराचे महत्व प्राप्त करुन देण्यासाठी त्यांनी अध्यक्ष पदाच्या काळात प्रयत्न केले. सेवाभावी वृत्ती तसेच सर्वांना सोबत घेवून काम करण्याची त्यांची इच्छा नेहमीच त्यांना पुढे नेत गेली. आपल्या कंपनीतील कर्मचारी, अधिकारी, वितरक यांच्याशी थेट संवाद साधत त्यांनी त्यांच्या अडचणी वेळोवेळी समजावून घेतल्या. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे. उद्या दि.१ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे कंपनीच्या अधिकारी, कर्मचार्यात व नातेवाईकांत हळहळ व्यक्त होत आहे.