नांदेड| नांदेडच्या इतिहासाचे दाखले देणाऱ्या नंदगिरीच्या किल्ल्यावर पोलीस विभागाच्या वतीने शिवकालीन व आधुनिक शस्त्रांचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. या प्रदर्शनाला शहरातील नागरिकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने भेट देत असून, शस्त्रांबद्दल माहिती जाणून घेत आहेत. या ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व उपअधीक्षक सुरज गुरव यांनी पुढाकार घेतला आहे.
नांदेडचा इतिहास सांगणाऱ्या नंदगिरीच्या किल्ल्याला आता नवे वैभव प्राप्त झाले असून, पोलीस उपअधीक्षक तथा आधुनिक किल्लेदार सुरज गुरव यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवक व स्वयंसेवकांनी यासाठी पुढाकार घेत स्वच्छता मोहीम राबवली. या हातांमुळेच आता नंदगिरीचा किल्ल्याला ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे. किल्ल्यावर वाढलेली झाडेझुडपे काढून सर्व परिसर चकाचक करण्यात आला. या उपक्रमानंतर आणखी एक पाऊल पुढे टाकत पोलीस
विभागाच्या वतीने किल्ल्यावर शस्त्रांचे प्रदर्शन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दि.२१ व २२ असे दोन दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार होते. यातून ऐतिहासिक शस्त्रांबरोबरच पोलिस विभागतील आधुनिक शस्त्रेही या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. पुरातन तोफही दिमाखात पुन्हा उभी राहिली आहे. शस्त्र प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील नागरिकांबरोबरच विद्यार्थ्यांमध्येही या प्रदर्शनाबाबत उत्सुकता लागून राहिल्याने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांची गर्दी वाढू लागली आहे. या निमित्ताने नांदेड शहराचा ऐतिहासिक ठेवा विद्यार्थ्यांसमोर येऊ लागला आहे.