अनाथांच्या निवारा बालगृहास विद्यार्थ्यांची आर्थिक मदत

नांदेड| लोककलावंत, अनाथ, निराधार, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार, वंचित, भटके विमुक्त, आदीवासी तसेच गरीब कुटुंबातील मुलामुलींसाठी जामखेड तालुक्यातील समताभूमी मोहाफाटा येथे कार्यान्वित असलेल्या निवारा बालगृहास जवळा येथील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सामाजिक दातृत्वाचा एक भाग म्हणून आपल्या खाऊच्या पैशातून आर्थिक मदत दिली. यावेळी निवारा बालगृहाचे प्रतिनिधी गोरख भोसले मच्छिंद्र भोसले, आदित्य चौगुले, शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, शिक्षक नेते संतोष अंबुलगेकर, सहशिक्षक संतोष घटकार, हैदर शेख यांची उपस्थिती होती.
शासनमान्य असले तरी विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या ग्रामीण विकास केंद्र संचलित या बालगृहासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळणे आवश्यक आहे. दानशूर व्यक्तींनी यासाठी पुढे येऊन सढळ हाताने मदत करणे गरजेचे आहे. या जाणिवेतून जवळा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळणाऱ्या खाऊच्या पैशातून जमा होणारा निधी निवारा बालगृहाच्या प्रतिनिधींना सुपुर्द केला. निराधारांची सेवा हीच खरी सेवा असल्याने मत शिक्षक नेते संतोष अंबुलगेकर यांनी व्यक्त केले.
